अमरावती - मेळघाटातील गुगामल वन्यजीव परिक्षेत्राच्या आरएफओ दीपाली चव्हाण यांनी उपवनरक्षक विनोद शिवकुमार याच्या जाचाला कंटाळून गुरुवारी (दि. 25 मार्च) रात्री राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या केली होती. तद्पूर्वी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी दीपाली यांनी लिहीली होती. त्यानंतर धारणी पोलिसांनी शिवकुमारला अटक करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर आज (दि. 27 मार्च) आरोपीला धारणी येथील न्यायालयात हजर केले असता वनविभागातील महिला कर्मचारी आणि स्थंनिक महिलांनी धडक देत आरोपी शिवकुमारला ताब्यात देण्याची मागणी करत आरोपी शिवकुमारला फाशी द्या, अशा घोषणा दिल्या. दरम्यान, शिवकुमारला न्यायालयाने 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
यावेळी आरोपी शिवकुमारला न्यायालयात नेत असताना महिला मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाल्या होत्या. यावेळी पोलिसांनी मानवी साखळी करून आरोपीला न्यायालयात हजर केले. यावेळी ज्या वाहनांतून आरोपी विनोद शिवकुमारला पोलीस धारणी न्यायालयाने घेऊन जात होते त्या वाहनाला महिलांनी पूर्णपणे घेरले होते. यावेळी आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी खुद्द वनविभागाच्या महिला कर्मचारी वर्गाने केली. यावेळी न्यायालयात आरोपीला नेताना पोलिसांना मोठी कसरत करावी लागली.
हेही वाचा - दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : चव्हाण आणि शिवकुमारचे फोन रेकॉर्ड पोलिसांच्या हाती