अमरावती : आपण आतापर्यंत जुळे-तिळे झाल्याच्या घटना ऐकल्या आहेत. परंतु मेळघाटातील दूनी या गावातील रहिवासी असणाऱ्या एका महिलेने धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात एकाच वेळी चार मुलींना जन्म दिला आहे. माता आणि चारही मुली सुखरूप आहेत. एकाच वेळी चार मुलींना जन्म दिल्याचा विषय संपूर्ण मेळघाटात चर्चेचा ठरला आहे. जन्माला आलेल्या चारही मुलींचे वजन हे दीड किलोच्या आत आहे. त्यामुळे त्यांची अति दक्षता कक्षात काळजी घेतली जात आहे. मातेच्या प्रकृतीची देखील काळजी घेतली जात असल्याची माहिती धारणी उपजिल्हा रुग्णालयातील बालरोग तज्ञ तथा वैद्यकीय अधीक्षक दयाराम जावरकर यांनी दिली आहे.
गर्भावस्थेतही 'ती' करायची मजुरी : दूनी येतील रहिवासी पपीता बलवंत (वय 24) ही पती बलवंत उईके याच्यासोबत वरुड तालुक्यात मजुरीचे काम करीत असताना तिला गर्भधारणा झाली. यानंतर तिने आपल्या गावात येऊन दूनी येथील आरोग्य उपकेंद्रात गर्भवती झाल्याची नोंद केली. गावातील आशा वर्करने तिला महिनाभराच्या औषधी दिल्या. औषधी घेतल्यावर ती कामासाठी वरुडला परत आली. गवंडी काम करीत असतानाच औषध संपल्यावर ती दूनीला जायची आणि औषध घेऊन परत वरुडला यायची. पपीता उईके आणि बलवंत उईके या दांपत्याला पहिला मुलगा देखील आहे.
सोनोग्राफीत दाखवले होते दोनच बाळ : वरुड येथे मजुरी काम करत असताना पपीता उईके या पाच महिन्याच्या गर्भवती असताना त्यांना त्रास जाणवला होता. तेव्हा त्यांनी वरुड येथील एका खाजगी रुग्णालयात जाऊन सोनोग्राफी केली होती. त्यावेळी सोनोग्राफी रिपोर्टवरून त्यांना दोन बाळ होणार असे सांगण्यात आले होते. विशेष म्हणजे आठ महिन्यानंतर त्या आपल्या घरी दूनी आल्या असता धारणी उपजिल्हा रुग्णालयात त्यांची दुसऱ्यांदा सोनोग्राफी केली असता तेव्हाही त्यांच्या गर्भात दोनच बाळ असल्याचे स्पष्ट झाले होते. असे असताना देखील बुधवारी धारणी उपजिल्हा रुग्णालयात प्रसूती दरम्यान पपीता उईके यांनी चार मुलींना जन्म दिल्याने डॉक्टरांसह सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.
हेही वाचा :