अमरावती - राज्य शासनाने 33 कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत मोठा गाजावाजा करीत पोहरा वनविभागातील आरड-कुराड जंगल भागात झाडे लावली. मात्र, या भागात मोजक्याच झाडांना पाणी दिले जाते, तर मोठ्या प्रमाणात वृक्ष पाण्याविनाच असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हे वृक्ष जगणार तरी कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शहरापासून अवघ्या 10 किमी अंतरावर असणाऱ्या अराड-कुराड जंगल भागात मोठ्या प्रमाणावर सागवानसह विविध प्रजातीचे वृक्ष लावण्यात आले आहे. या भागातील वृक्ष संवर्धनासाठी जीवन व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे. मात्र, या समितीचे अध्यक्ष प्रकाश डकरे यांनी वन विभागाच्या कार्यप्रणालीवर आक्षेप घेतला आहे. त्याबाबत त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी चर्चा केली. त्यामधून काही धक्कादायक बाबी उजेडात आल्या आहेत.
वृक्ष लागवड केलेल्या झाडांपैकी रस्त्यावर असणाऱ्या झाडांनाच टँकरने पाणी दिले जाते. विशेष म्हणजे हा खासगी टँकरला ओढत आणणारा ट्रॅक्टर हा वनरक्षकाच्या मालकीचा आहे. नाल्यामधील पाणी या टँकरमध्ये भरून झाडांना पुरवले जाते. मात्र, त्याच नाल्याचे पाणी विरुद्ध दिशेला पाईप टाकून नेले, तर जंगलात दूरवर लावण्यात आलेल्या रोपांना पाणी देणे सोयीचे होऊ शकते, असा सल्ला डकरे यांनी दिला होता. मात्र, वनविभागाने असे काहीही केले नाही. झाडे वाचविण्यासाठी कुंपण घालणे आवश्यक असताना अद्यापही या परिसरात कुंपण लावण्यात आले नाही. यामुळे जनावरे लहान रोपटे खात आहेत. साध्य सुरू असलेले काम नियोजन शून्य असल्याचे ते म्हणाले. तसेच या भागात लावण्यात आलेले वृक्ष खरोखर जगतील का? याबाबत शंकाही डकरे यांनी उपस्थित केली.
हे वाचलं का? - बदनापूरमध्ये सरकारच्या वृक्ष लागवड योजनेला तहसीलदारांकडून हरताळ