अमरावती - जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांनी सुरू केलेले रास्ता रोको आंदोलन प्रशासनाने दखल न घेतल्याने चिघळण्याची शक्यता आहे. प्रकल्पग्रस्तांनी सोमवार पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 'रास्ता रोको' सुरू केला आहे. आज आंदोलनाचा दुसरा दिवस असून प्रशासनाने यांची दखल घेतली नाही. त्यामुळे आंदोलकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समितीच्या वतीने मनोज चव्हाण यांच्या नेतृत्वात सोमवारी ४ वाजता हजारो प्रकल्पग्रस्तांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचला. यावेळी आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या देऊन विद्यापीठ, गर्ल्स हायस्कूल आणि सुंदरलाल चौकाकडून येणारी वाहतूक अडवली. विभागीय स्तरावर पाटबंधारे प्रकल्पासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी, घरे संपादित केले आहेत, त्या प्रकल्पग्रस्तांना जे आश्वासन देण्यात आले ते अद्यापही पूर्ण करण्यात आलेले नाही. यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये रोष आहे.
सोमवारी विभागीय आयुक्तांना प्रकल्पग्रस्तांनी निवेदन दिले. मात्र, यावर कुठलाही तोडगा निघाला नाही. यामुळे आंदोलकांनी रात्रभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या कायम ठेवला. प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींनी आंदोलनाची दखल घेतली नाही. त्यामुळे आज जिल्ह्यातील हजारो प्रकल्पग्रस्त आंदोलनात सहभागी होणार असून हे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे.