अमरावती : पश्चिमी विक्षोम अर्थात पश्चिमेकडील हवेच्या दबाचा अडथळा वारंवार दक्षिण हिमालयावर येतो आहे. त्यामुळे वातावरणात बदल झालेला जाणवतो आहे. अशा परिस्थितीत उत्तर भारतात निर्माण झालेले ढगाळ वातावरण विदर्भाकडे येत असल्यामुळे विदर्भात जिकडे तिकडे पाऊस कोसळतो आहे. आता उन्हाळाभर अशीच परिस्थिती राहणार असून या महिन्यात आणखी पाऊस कोसळेल असा अंदाज प्रा. अनिल बंड यांनी व्यक्त केला आहे. तसेच मे महिन्यात देखील असाच अधून-मधून पाऊस कोसळत राहणार आहे. या परिस्थितीत यावर्षी कमाल तापमान हवे तसे वाढणार नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
यामुळे कोसळतो आहे अवकाळी पाऊस : सध्या दक्षिण राजस्थानवर चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. त्याबरोबरच मध्य प्रदेश, विदर्भ, तेलंगणा, आंध्र प्रदेश तामिळनाडू राज्यात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. द्रोणीय स्थिती तसेच वादळात अडथळे निर्माण होत असल्यामुळे विदर्भात अवकाळी पावसाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे काल पुर्व विदर्भ, पश्चिम विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार तसेच वादळी पाऊस पडला. पश्चिम विदर्भात कही ठिकाणी गारपीट झाल्याचे प्रा. अनिल बंड यांनी सांगितले.
मनुष्यासह वनस्पतींची प्रकृती बिघडणार : शुक्रवारी अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळला. शनिवारी देखील पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भात आणखी दोन-तीन दिवस मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज आहे. उन्हाळ्यात पाऊस कोसळायला लागल्यामुळे याचा परिणाम माणसांच्या आरोग्यावर निश्चितपणे होणार आहे. हवामानातील हा बदल माणसांप्रमाणेच वनस्पतींच्या प्रकृतीतही बिघाड आणणारा असल्याचे प्रा. अनिल बंड यांनी सांगितले. या पावसामुळे विदर्भातील आंबा, संत्री या सर्वच फळबागांना प्रचंड फटका बसला आहे. अनेक भागात संत्रा गळून पडला अशी परिस्थिती आहे. टरबूज, खरबूज हे देखील खराब झाले आहेत. कांद्याला या पावसाचा मोठा फटका बसला आहे. आता उन्हाळ्यात शेतांमध्ये पीक घेतले जात नाही, मात्र या पावसामुळे फळबागा उध्वस्त झाल्या असल्याचे प्राध्यापक अनिल बंड म्हणाले.
अनेक भागात कोसळणार पाऊस : शुक्रवारी संपूर्ण विदर्भात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला. आजही विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस कोसळणार असा अंदाज आहे, मात्र हा पाऊस कालच्यासारखा तीव्र स्वरूपाचा नसेल. 9, 10, 11 एप्रिलला पावसाची तीव्रता वाढणार असल्याचे ते म्हणाले. त्यानंतर दोन-तीन दिवस पाऊस कोसळणार नसल्याची माहिती बंड यांनी दिली. तसेच 15 ते 20 एप्रिल दरम्यान हलका, मध्यम स्वरूपातील पावसाची शक्यता आहे. में महिन्यात देखील दोन-तीन वेळा आता सारखेच पावसाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता असल्याचे प्राध्यापक अनिल बंड यांनी स्पष्ट केले.