अमरावती - लग्न म्हटले की डोळ्यासमोर उभे राहते ते बँड बाजा गाजावाजा करत लग्नमंडपात येणारा नवरदेव. अन् आतमध्ये बसून आपल्या नवरदेवाची वाट बघणारी नववधू. मात्र, जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे चक्क नवरी नवरदेवासोबत जणू झाशीच्या राणीसारखी घोड्यावर स्वार होऊन लग्नमंडपापर्यंत आली.
महादेव कोळी समाजाची लग्नाबद्दल एक वेगळी परंपरा आहे.या परंपरेत मुलगा आणि मुलगी घोड्यावर स्वार होऊन लग्नमंडपापर्यंत येतात. विदर्भातील लोकांसाठी ही पद्धत नवखी आहे. मात्र, पश्चिम महाराष्ट्रात ही परंपरा आजही चालत आहे. या परंपरेमुळे विदर्भातील नवरीला घोड्यावर स्वार होण्याची संधी मिळाली आहे.
कोळी समाजातील पंढरपूरला राहणाऱ्या गोविंद करमकर याची अमरावती जिल्ह्यातील नागलवाडी गावातील शीतल कांबळे या मुलीशी लग्न जमले. आज २१ मे रोजी टी. एम. सी. मंगल कार्यालय धामणगाव येथे संपन्न झाला. दोघांनीही भेदभाव न करता समसमान राहण्याचा संकल्प केला. यावर नवरी शीतलने घोड्यावर बसून लग्नमंडपात येण्यासाठी होकार दिला आणि दोघांचीही घोड्यावरून वरात निघाली.
कोळी समाजातील बहुतांश लोक नवऱ्या मुलीला घोड्यावर बसवतात. त्यामुळे मुलीच्या इच्छा पूर्ण होतात. समाजामध्ये मुलींना समसमान दर्जा दिल्याचा संदेश जात असल्याचे वऱ्हाडी म्हणाले.