अमरावती - व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्यावर ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार केले जाते ती जागा म्हणजे स्मशानभूमी. स्मशानभूमीबद्दल २१ व्या शतकातही अनेकांच्या मनात विविध गैरसमज, भीती आणि दहशत पाहायला मिळते. त्यामुळे अनेकजण स्मशानभूमीत जाणे टाळते. आजही महिला स्मशानभूमीमध्ये जाण्यास हिंमत करत नाही. पण वरुड तालुक्यातील हातुर्णा ( Haturna Village ) या गावात मात्र वेगळं चित्रं आपल्याला पहायला मिळते. या गावातील स्मशानभूमीत लहान मुलापासून ते महिलांपर्यंत सर्वांचा इथे मुक्त वावर ( Unique Cemetery Amravati ) असतो. स्मशानभूमीला येथील ग्रामस्थ रमणीय ठिकाण समजतात. दिवसभर येणाऱ्या जाणाऱ्यांची मोठी वर्दळ असते. स्मशानभूमीत गेल्यास एखाद्या छोट्या पर्यटनस्थळी ( Amravati Tourism ) आल्याचे समाधान मनाला वाटतं. त्याचे कारणही तसचं आहे.
अमरावती, वर्धा आणि नागपूर जिल्ह्याच्या सीमेवर वर्धा नदीच्या ( Wardha River Amravati ) तिरावर अमरावती जिल्ह्यातील हातुर्णा हे शेवटचे गाव आहे. पूर्वी या गावातील स्मशानभूमी वर्धा नदीपात्रात होती. दोन दशकांपूर्वी वर्धा नदीवर अप्पर वर्धा धरणाची निर्मिती झाल्यानंतर नदीच्या तिरावर दोन ते तीन एकर जागेवर माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांच्या संकल्पेतुन या स्मशानभूमीची पायाभरणी करण्यात आल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली.
स्मशानभूमीत रमणीय वातावरण -
वर्धा नदीला बाराही महिने मुबलक पाणी असते. त्यामुळे हिरव्यागार झाडांनी ही स्मशानभूमी बहरली आहे. मोठ-मोठे वृक्ष, फुलांची हिरवीगार झाडे, मोठ्या झाडांवर रंगेबीरंगी चित्र, संताचे चित्र या स्मशानभूमीत दिसून येतात. रमणीय वातावरण असल्याने आजूबाजूच्या गावांतील लोक देखील या ठिकाणी थेट डबा पार्टी करायला येतात. तसेच वर्धा-अमरावती जिल्ह्याला जोडणारा मोठा पूल असल्याने विलोभनीय दृश्य पाहायला मिळते.
राष्ट्रसंत तुकडोजी महारांजाच्या विचारांचा वारसा -
वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी त्यांच्या ग्रामगीतेत मृत्यूनंतर अंत्यसंस्कार कसे व्हावे, स्मशानभूमी कशी असावी याचा उल्लेख केला आहे. त्यामुळेच या स्मशानभूमीत आध्यात्मिक वातावरण राहावे म्हणून राम मंदिर, हनुमान मंदिर, दुर्गा मातेचे मंदिर बांधले आहे. याठिकाणी रामनवमी कार्यक्रम देखील केले जात असल्याचे येथील ग्रामस्थ रामचंद्र ठाकरे यांनी सांगितले.
तरुण करतात व्यायाम -
हल्ली पोलीस भर्तीचे प्रशिक्षण घेणारे तरुण रस्त्यावर धावतात. गावातील तरुण मात्र याच स्मशानभूमीत पोलीस भर्तीचे प्रशिक्षण घेतात. तसेच महिला आणि पुरुष देखील सकाळी व्यायामाला येत असतात.