अमरावती - शहरात 4 नोव्हेंबरला राजपेठ परिसरातील एसबीआय बँकेच्या शाखेतून एका दिव्यांग वृद्धाने आपल्या पत्नीसह येऊन एक लाख रुपयाची रक्कम काढली होती. ही रक्कम घेऊन हे वृद्ध दाम्पत्य गावाला जाण्यासाठी बसस्थानकाकडे ऑटो ने जात असताना, आधीच पाळत ठेऊन असलेल्या दोन चोरट्यांनी दुचाकीवरून त्यांचा पाठलाग केला. यानंतर चालत्या ऑटोतून वृद्ध महिलेजवळील एक लाख रुपये असलेली पिशवी हिसकावून नेली.
आता या दोन्ही वाटमारी चोरट्यांना अशाच एका चोरीत नागरिकांच्या सतर्कतेने यवतमाळ पोलिसांनी पकडले आहे. या दोघांनाही अमरावती शहरातील सिटी कोतवाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. जय मालिका प्रधान आणि आर रविकुमार मोहन हे दोन्ही चोरटे ओडिशा राज्यातील असून केवळ चोऱ्या करण्यासाठी महाराष्ट्रात वास्तव्यस असल्याचे पोलीस तपासात पुढे आले. त्यांना सध्या न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ओडिशा राज्यातील असलेले हे चोरटे काही महिन्यांपूर्वी नागपुरात दाखल झाले होते. नागपुरातच त्यांचे वास्तव्य असून त्यांनी वाटमाऱ्या करण्यासाठी ओडीसामधूनच दुचाकीसुद्धा आणली आहे. ४ नोव्हेंबरला हे दोघेही अमरावती शहरात आले होते. त्यांनी राजापेठ परिसरातील एसबीआय बँकेत रक्कम काढण्यासाठी आलेल्या दिव्यांग शामराव कुरवाडे व त्यांच्या पत्नीचा पाठलाग करून एक लाख रुपयांची रोख रक्कम उडवली होती. श्यामराव कुरवाडे यांचा काही वर्षापूर्वीच एसटी अपघातात हात निकामी झाला आहे.