अमरावती- जिल्ह्यात लॉकडाऊन काळात ग्रामीण भागात दोन खुनांच्या घटनांमुळे शनिवारी खळबळ उडाली. वरुड तालुक्यातील पुसला व नांदगावखंडेश्वर तालुक्यातील अडगाव (बुद्रूक) शिवारात एका वृद्धासह अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला. पुसला येथे बकऱ्या चारणाऱ्या वृद्धाचे (वय ७०) मुंडकेच धडापासून वेगळे केले, तर अडगाव (बुद्रूक) येथे एका व्यक्तीची हत्या करून मृतदेह ठेवलेल्या पोत्यात दगड टाकून विहिरीत फेकला.
बाळकृष्ण भोलाजी भारसाकळे (वय ७२, रा. पुसला) हे शेतीसोबतच शेळ्या चारण्याचे काम करत होते. शनिवारी शेळ्या घेऊन खराळा येथील स्वतःच्या शेतात गेले. सायंकाळी त्यांचा मृतदेह त्यांच्या शेतालगतच्या हरिदास पाटील यांच्या शेतात आढळला. भारसाकळे यांचे मुंडके व हात धडापासून वेगळा केला होता. धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. ही घटनावरुड तालुक्यातील शेंदूरजनाघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. भारसाकळे यांच्या शरीरावर इतरही ठिकाणी जखमा आढळल्या. भारसाकळे यांच्या खुनाचे कारण समजू शकले नाही. गावात त्यांचे कुणाशी भांडण नाही किंवा आर्थिक दृष्टीने सधनही नाही, अशा स्थितीत त्यांची हत्या कुणी व का करावी? हे तपासण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. शेंदूरजनाघाट पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.
नांदगावखंडेश्वर तालुक्यातील लोणी ठाण्याच्या हद्दीत अडगाव (बुद्रूक) येथील सुनील भाऊराव पडोळे यांच्या शेतातील विहिरीतून शनिवारी दुर्गंधी येत होती. विहिरीत डोकावून बघितले असता, एक गाठोडे त्यात दिसत होते. लोणी पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. मृत व्यक्ती अंदाजे (३५ वर्षे) आतील असावा. त्याच्या शरीराचा अर्धा भाग एका पोत्यात बांधला होता. मृतदेह टाकण्यापूर्वी त्याच पोत्यात अंदाजे पंचवीस ते तीस किलो वजनाचे पाच ते सहा दगड टाकून नंतर मृतदेह विहिरीत फेकल्याचे स्पष्ट झाले.
मृत व्यक्तीच्या शरीरावर एकही शस्त्राचा वार नाही किंवा कुठे खरचटल्याची जखम नाही, असे पोलीस निरीक्षक एम. एस. अहेरकर यांनी सांगितले. इतर ठिकाणी हत्या करून मृतदेह येथे फेकला असावास अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केलीय.तीन दिवसांपूर्वीची ही घटना असावी. त्यामुळे दुर्गंधी पसरली होती. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटू शकली नाही. लोणी पोलिसांनी सुनील भाऊराव पडोळे यांच्या तक्रारीवरून अनोळखी व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.