अमरावती - जिल्ह्याच्या चांदूर बाजार तालुक्यातील हिरुळपूर्ण येथे मुंबईवरून काही दिवसांपूर्वी आलेल्या आई व मुलाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून सर्व प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे.
१७ मे रोजी मुंबई येथील एका पोलीस कर्मचाऱ्याची पत्नी तीन वर्षांच्या मुलासोबत हिरुळपूर्णा येथे आपल्या माहेरी आली होती. त्यानुसार तालुका प्रशासनने त्यांना गावातीलच जिल्हा परिषद शाळेतील क्वारंटाईन सेंटरला दाखल केले होते. २१ मे रोजी या दोघांचे स्वॅब घेण्यात आले. आज(बुधवार) सकाळी या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याची माहिती मिळाली. त्यानुसार उपविभागीय अधिकारी संदीप अपार यांनी हिरुळपूर्णा, सर्फाबाद, शहापूर हे गाव सील करण्याचे आदेश दिले आहेत. गावात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली आहे. तसेच गावातील ३ किलोमीटर अंतरावर असलेला संपूर्ण भाग कंटेनमेंट झोन व १२ किलोमीटरचा परिसर बफर झोन म्हणून घोषित करण्यात येणार असल्याची माहिती आहे. गावात आरोग्य यंत्रणा पोहोचली असून सदर महिलेच्या संपर्कात आलेल्या कुटुंबीयांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
सदर महिला ही आपल्या ३ वर्षीय मुलासह मुंबईवरून भाडेतत्त्वावर घेतलेल्या वाहनाने आले होते. या वाहनात चालकासह इतर ५ व्यक्ती होते. यामुळे उर्वरित तीन व्यक्तींचा शोध घेणे सुरू आहे. हिरुळपूर्णा येथे कल्याण, मुंबई, पुणे व ठाणे या रेड झोनमधून एकूण सहा व्यक्ती आलेले आहेत. यापैकी दोघांची तपासणी केली असता, अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर, उर्वरित ४ व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी हिरुळपूर्ण ग्रामवासीयांनी गावाच्या सीमेवर चेक पोस्टची उभारणी करण्यात आली होती. मात्र, प्रशासानातर्फे गावकऱ्यांना कोणतीच मदत होत नसल्याने अखेर गावकऱ्यांनी ही चेकपोस्ट बंद केली. सदर रुग्णांचे पॉझिटिव्ह चाचणी अहवाल प्राप्त होताच प्रभारी तहसीलदार अभिजित जगताप, गट विकास अधिकारी प्रफुल्ल भोरगडे, मंडळ अधिकारी गजानन दाते, ग्रामसेवक निलेश घुरडे, आरोग्य विस्तार अधिकारी अवसरमोल सह सहायक पोलीस निरीक्षक पंकज दाभाडे, तेजस्विनी गिरसावले पोलीस बंदोबस्तासह उपस्थित होते.
हिरुळपूर्णासह ग्रामीण भागातील क्वारंटाईन सेंटरवर राहणाऱ्या व्याक्तींकरता कोणतीच व्यवस्था केली गेली नाही. तसेच ग्रामीण भागातील क्वारंटाईन सेंटरवर रात्री कोणत्याच कर्मचारीची ड्युटीसुद्धा नाही. यामुळे सदर महिला रोज रात्री घरी झोपायला जात होती. तसेच या महिलेचा मुलगा केवळ ३ वर्षाचा असल्याने या मुलाचा परिवारातील अनेक सदस्यांशी संपर्क आला होता, अशी माहिती गावकऱ्यांनी दिली. मात्र, याला प्रशासनाने अद्याप दुजोरा दिला नाही. या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची आरोग्य, महसूल व पोलीस प्रशासनाकडून चौकशी सुरू आहे.