अमरावती : जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ही १ हजार १५० च्या वर गेली आहे. त्यामुळे रुग्णांची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने दोन दिवसीय जनता कर्फ्यूचे आवाहन अमरावती जिल्ह्यातील नागरिकांना करण्यात आलेले आहे. त्याच पार्श्वभूमीवर दर आठवड्याला शुक्रवारी सायंकाळी ७ वाजतापासून ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत हा जनता कर्फ्यू पाळला जाणार आहे. शुक्रवारी सायंकाळी ७ पासून सुरू झालेल्या या जनता कर्फ्यूला अमरावती जिल्ह्याच्या चांदुर रेल्वे शहरातही नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे, आज(रविवार) चांदुर रेल्वेतील बाजारपेठेत शुकशुकाट पसरला होता.
देशासह राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. पश्चिम विदर्भातील अकोला नंतर अमरावती जिल्हा हा कोरोनाचा आता नवा हॉटस्पॉट झालेला आहे. आधी शहरात असलेला कोरोना आता ग्रामीण भागातही पोहचल्याने प्रशासनाच्या वतीने उपाययोजना केली जात आहे. त्यामुळे आता जनता कर्फ्यूच्या माध्यमातून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रत्येक आठवड्याला हा दोन दिवसीय जनता कर्फ्यू पाळला जाणार आहे. त्याच अनुषंगाने आज अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागांमधील जनतेने जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत जनता कर्फ्यूचे पालन केले. त्यामुळे आज फक्त मेडिकल आणि रुग्णालय सुरू होते. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पसरला होता.