अमरावती - जगाला मानवतेची शिकवण देणाऱ्या वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी आयुष्यभर आपल्या प्रबोधनातून अंधश्रद्धेसारख्या अनिष्ट रूढींवर प्रहार केला. शेतकऱ्यांना अर्पण केलेल्या ग्रामगीता ग्रंथातूनही त्यांनी जगाला तोच संदेश दिला. तरीही आज २१ व्या शतकात महिला स्मशानभूमीत जात नाहीत. त्यांच्या मनात वेगवेगळ्या अंधश्रद्धेने घर केले आहे. मात्र, या सर्व रूढी परंपरेला अमरावती जिल्ह्यातील संत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी असलेले यावली शहीद हे गाव अपवाद ठरत आहे. या गावातील महिला वर्षातून एकदा या स्मशानभूमीत कार्यक्रमाचे आयोजन करतात.
येथे मुली स्मशानभूमीचा रस्ता रांगोळी काढून सजवतात. हे अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेल्या महिलांनी आदर्श घ्यावा, असे दृश्य आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी असलेल्या यावली शहिद या गावात तुकडोजी महाराजांचा जन्मोत्सव अर्थात ग्रामजयंती मोहत्सव सुरू आहे. स्मशानभूमी बद्दल महिलांच्या मनातील भय दूर व्हावे, स्मशानभूमी हे एक पवित्र मंदिर आहे, हे लोकांना समजावे, म्हणून या स्मशान भूमीत हा कार्यक्रम घेतला जातो. २००९ मध्ये या उपक्रमाची सुरुवात झाली होती. यावर्षी या उपक्रमाला १० वर्षे पूर्ण झाली आहेत. गावात दैनदिन सामुदायिक ध्यान आटोपल्यानंतर हजारो महिला व पुरुष स्मशानभूमीकडे येतात.
या गावातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मस्थान ते मोक्षधामचा जवळपास २ किलोमीटर रस्ता हा सुंदर रांगोळीने सजवला जातो. सकाळी साडेसहा वाजता महिला व लहान मुले तुकडोजी महाराजांचा जयघोष करत स्मशानभूमीपर्यंत येतात. येथे महिला-महिला भजन-किर्तन करतात. त्यानंतर महिला-मुलांनी नाश्ता केला.
स्मशानभूमी म्हटले, की विदारक चित्र आपल्याला पाहायला मिळते. मात्र, यावली शहीद गावातील स्मशाभूमीत निसर्गरम्य वातावरण आहे. येथे संत महात्म्यांच्या २५ मूर्तींची स्थापनाही करण्यात आली आहे.