अमरावती - अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणारे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा अर्थात ग्रामजयंती महोत्सव येत्या 30 एप्रिलला साध्या पद्धतीने साजरा होणार आहे. महाराजांची जन्मभूमी असलेल्या अमरावती जिल्ह्यातील यावली शहीद या गावात सोहळा पार पडणार आहे. तत्पूर्वी दरवर्षी 28 तारखेला यावली शहिद येथील स्मशानभूमीत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. परंतु आता केवळ काही गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत यावली शहीद येथील स्मशानभूमीत ग्रामस्वच्छता अभियान पार पडले. यावेळी स्मशानभूमीत असलेल्या सर्व देव देवतांच्या मूर्तींना स्नान घालुन त्यांना स्वच्छ करण्यात आले. एकीकडे कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढल्याने देशभरातील मोठ्या शहरातील स्मशानभूमी शेकडो मृतदेहांच्या चिता धगधगत असताना यावली शहीद येथील स्मशानभूमीत कमालीची प्रसन्नता पाहायला मिळाली होती. यावेळी उपस्थित लोकांनी मागील एका वर्षात निधन झालेल्या यावलीतील लोकांना श्रद्धांजलीही वाहिली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ग्रामजयंती महोत्सव सध्या सुरू आहे. 30 तारखेला पहाटे तुकडोजी महाराज यांचा जन्मोत्सव हा यावली शहीद सह राज्यातील अनेक गावांत साजरा होतो. यावर्षी कोरोनामुळे हा ग्रामजयंती महोत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. दरवर्षी 28 एप्रिलला यावली शहीद येथे हजारो गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत स्मशानभूमीत हा आगळा वेगळा कार्यक्रम पार पडत असतो. 28 तारखेला या गावातील महिला बालके हे उत्साहाने या स्मशानभूमीत येऊन कार्यक्रमात मग्न होतात. येथे भजन कीर्तन सुद्धा केले जाते. दरम्यान यावर्षी कोरोनामुळे काही गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जन्मभूमी समितीचे सर्व पदाधिकारी तसेच राष्ट्रसंत युवक विचार मंचचे पदाधिकारी आणि गुरुदेव भक्त उपस्थित होते.
राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा जन्मोत्सव अर्थात ग्रामजयंती महोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात 30 एप्रिलला यावली शहीद येथे हजारो भक्तांच्या उपस्थितीत साजरा होतो. परंतु कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता तसेच शासनाच्या नियमांचे पालन करत मागील वर्षीप्रमाणे यंदाही हा ग्रामजयंती महोत्सव गुरुदेव भक्तांनी घरूनच साजरा करण्याचे आवाहन गुरुदेव भक्तांना केले आहे. यावली शहीद येथील गुरुदेव भक्त हे स्वतः आपल्या घरूनच तुकडोजी महाराज यांचा जन्मोत्सव तीस तारखेला पहाटे साजरा करणार आहे. आज स्मशानभूमीतही मोजक्या गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत ग्रामस्वच्छता अभियान पार पाडले.