अमरावती - जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी-राष्ट्रीय महामार्गावरील आकोट रोडवर सातेगाव फाट्या नजीक ट्रकची विद्युत खांबास धडक बसली. या धडकेत ट्रकला लागलेल्या आगीत तूर डाळीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना रविवारी रात्री घडली आहे.
अकोला येथून लकिमपुर मध्यप्रदेश येथे २० लाख रुपयांची २५ टन तुरीची डाळ घेऊन जाणाऱ्या मालती कैशिक रा. ग्वाल्हेर यांच्या मालकीच्या ट्रक (क्र. एमपी-09-एचजी8693) चे स्टेरिंग लॉक झाल्याने चालक गोपाल सिंग उमेदसिंग (वय - ३३, रा. ग्वाल्हेर) यांचे नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या खांबला ट्रकची धडक बसली. त्यामुळे इलेक्ट्रीक खांबावरील तारांची स्पार्कींग झाल्याने आगीचे गोळे ट्रकवर पडून आग लागली. या आगीत ट्रकमधील तुर डाळीचे पोते जळुन खाक झाले, असुन ट्रकसुध्दा जळाला आहे. सुदैवाने ट्रक चालक व क्लिनरने ट्रकमधून उडी मारल्याने त्यांचे प्राण वाचले. तसेच ट्रक बाजुच्या शेतात गेल्याने जवळच्या शेतातील खोपडीत असलेली जनावरे हंबरडू लागली होती.
आगीने रौद्र रुप घेऊन गुरांचा गोठा पेटु शकतो त्यामुळे कुठलेही नुकसान होऊ नये म्हणुन ट्रकचालकाने गुरांच्या गोठ्याचे दार तोडून जनावरांना घटनास्थळापासून दुर नेऊन माणुसकीचे दर्शन घडवले. सदर अपघातात २० लाख रुपयांची डाळ व ट्रक असे जवळपास ३५ ते ४० लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. तर, घटनेचा पुढील तपास अंजनगाव पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी जावरे करत आहेत.