अमरावती - धारणी तालुक्यातील टेंबली येथे एका आदिवासी महिलेवर दोन नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. मात्र स्थानिक आमदार व पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या दबावामुळे पोलिसांनी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप भाजपाच्या अमरावती जिल्हाध्यक्ष निवेदिता दीघडे आणि प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केला आहे. यासाठी त्यांनी थेट धारणी पोलीस ठाण्यावर धडक दिली. दरम्यान, या प्रकरणी भाजपा आक्रमक झाली असून नेत्या चित्रा वाघ आज (बुधवारी) धारणीत जाऊन पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन करणार आहेत.
सत्ताधाऱ्यांच्या दबावाला बळी पडून पोलिसांनी देखील हे प्रकरण गुंडाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप निवेदिता चौधरी-दीघडे आणि शिवराय कुळकर्णी यांनी केला आहे. त्यांच्या नेतृत्वात मेळघाटातील भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी धारणी पोलीस ठाण्यावर धडकले होते.
दोन दिवसात पीडितेला न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपाने दिला होता. महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या जिल्ह्यात महिला सुरक्षित नसल्याबद्दल भाजपाने राज्य सरकारचा निषेध केला आहे. दरम्यान आज पुन्हा भाजपच्या नेत्या चित्रा वाघ या धारणी येथे जाऊन आंदोलन करणार आहेत.