अमरावती- शहरातील गर्ल्स हायस्कूल चौक येथे आज वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण झाली होती. ट्रॅफिक सिग्नल बंद असल्यामुळे चौकात चारही दिशेने येणारी वाहतूक एकाच ठिकाणी खोळंबल्याने वाहतूक व्यवस्थेची चांगली बोंबाबोंब झाली. विशेष म्हणजे रस्ता सुरक्षा अभियान धडाक्यात राबविले जात असताना वाहतूक व्यवस्थेची अशी दाणादाण उडाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
हेही वाचा- 'पटानी'च्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंनी दिले 'हे' उत्तर
गर्ल्स हायस्कूल चौक परिसरात चारही बाजूने येणारी-जाणारी बाहतूक खोळंबली होती. त्यामुळे बराच वेळ कुठल्याच वाहनाला मागे किंवा पुढे जाण्यासाठी जागा मिळत नसल्याने चौकात वाहतुकीची तारांबळ उडाली. अमरावती महापालिकेच्यावतीने ट्रॅफिक सिग्नल सकाळी दोन-अडीच तास आणि सायंकाळी दोन-अडीच तास सुरू राहत असून इतर वेळी वाहतूक व्यवस्था रामभरोसे असते, असे चित्र गर्ल्स हायस्कूलसह शहरातील सर्वच मुख्य चौकात नेहमीच पाहायला मिळते. ट्रॅफिक सिग्नल सतत बंद राहत असले तरी अशा वाहतूक कोंडीच्या वेळेस वाहतूक पोलीस महत्त्वाच्या चौकात नसतात. त्यामुळे वाहतूक कोंडीचा गोंधळ चांगलाच वाढत असल्याचा अनुभव अमरावतीकरांना आहे. सध्या रस्ता सुरक्षा अभियानाच्या नावाखाली अनेक भागात दुचाकी वाहनांना अडवून वाहन चालकांकडून कागदपत्र तपासण्याच्या मोहिमेला प्राधान्य दिले जात आहे. त्यातच वाहतुकीच्या नियमावलीची पायमल्ली होत असल्याचे दिसत आहे.