अमरावती - शहरातील बाजारपेठ रात्री 9 वाजेपर्यंत खुली ठेवण्याची मुभा प्रशासनाने दिली आहे. मात्र, शहर व जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाबाधितांची वाढती आकडेवारी आणि मृत्यूदर लक्षात घेताल शहरातील व्यावसायिकांनी सायंकाळी 7 वाजताच बाजारपेठ बंद करण्याचा निर्णय स्वयंस्फूर्तीने घेतला आहे.
अमरावती शहर आणि जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातला असून जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या मंगळवारी 9 हजार 673 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे दगावलेल्यांची संख्या 292 झाली आहे. शासकीय कोव्हिड रुग्णालयासह अनेक खासगी कोव्हिड रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढत आहे. तसेच जिल्ह्यात सध्या 35 ते 95 पर्यंतच्या वयोगटातील लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, लॉकडाऊन महाराष्ट्र टप्प्याटप्प्याने अनलॉक करत असताना जिल्हा प्रशासनाने रात्री 9 वाजेपर्यंत बाजारपेठ सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. प्रशासनाच्या निर्णयाचे व्यापाऱ्यांनी सुरुवातीला स्वागत केले. मात्र, सध्याची कोरोना संसर्ग प्रसाराचा वेग पाहता जिल्हा प्रशासनाने पुन्हा लॉकडाऊन केले तरी व्यापाऱ्यांची हरकत नाही, असे मत व्यापारी व्यापारी संघटनेचे पदाधिकारी पप्पू गगलानी यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केले.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बाजारपेठेतील व्यावासायिकांकडून योग्य ती काळजी घेतली जात आहे. कपड्यासह इतर सर्व व्यापारी प्रतिष्ठानांमध्ये ग्राहक नाका-तोंडाला मास्क न लावता आले तर त्यांना काही व्यापारी स्वतःजवळचे मास्क देतात. त्यानंतरच व्यवहार करत आहेत. तर काही व्यापारी आशा ग्राहकांना दुकानातच येऊ देत नाही. व्यापाऱ्यांनी आता स्वतः आपली दुकान सायंकाळी 7 वाजता बंद करण्याचा निर्णय घेतला असल्यांने शहरातील राजकमल चौक, जयस्तंभ चौक या भागातील सर्व प्रमुख आणि गर्दी असणारे मार्केट सायंकाळी 7 वाजता बंद होत आहे. कोरोनाचा प्रकोप असाच कायम राहिला तर पुन्हा लॉकडाऊन करावे, अशी मागणी आता व्यापरीच करू लागले आहेत.