अमरावती - कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे येथील जीवनावश्यक वगळता सर्व दुकाने २१ मार्चपासून बंद आहेत. तेव्हापासून सर्व व्यावसायिकांनी नियमांचे पालन करून व्यवसाय बंद केले. मात्र, लहान व्यवसायसुध्दा पूर्णपणे बंद असल्यामुळे त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या परिवारावर उपासमारीची वेळ आलेली आहे.
त्यामुळे आता चांदूर रेल्वेच्या व्यापाऱ्यांचा संयम तुटला असून त्यांनी मुख्याधिकारी व ठाणेदारांना निवेदन दिले. यामध्ये वेळ ठरवून व नियमांचे पालन करून दुकान उघडण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. व्यवसाय करण्यास मनाई केल्यास नाईलाजास्तव सर्व व्यापारी आपापल्या दुकानासमोर सहपरिवार उपोषणास बसणार, असा इशारा निवेदनातून देण्यात आला.