अमरावती - शुक्रवारी सायंकाळी आलेल्या मुसळधार पावसाने पर्थोट गावाला जलाशयाचे स्वरुप प्राप्त झाले होते. पावसाचे पाणी घरात घुसल्यामुळे नागरिकांनी वर्षभरासाठी साठवलेले धान्यही वाहून गेले आहे. गावालगतच्या नाल्याला पूर आल्याने एका शेतकऱ्याची ७५ हजार रुपयांची बैलजोडी ही वाहून गेली आहे.
पथ्रोट गावात शुक्रवारी सायंकाळी चार वाजता पासून सहा वाजेपर्यंत मुसळधार पाऊस झाला. या दरम्यान, गावातील शंभरच्यावर लोकांच्या घरात पावसाचे पाणी घुसून घरातील अन्नधान्य, दैनंदिन गरजेच्या वस्तु पुराच्या पाण्यात बुडाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहे. पथ्रोट गावातून अंजनगाव सुर्जीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बांधलेल्या पुलाचे भगदाळ बुजल्याने व त्यात शुक्रवारी सायंकाळी आलेल्या मुसळधार पावसाने गावाला जलाशयाचे स्वरुप प्राप्त झाले होते.
हेही वाचा - रायघोळ नदीच्या पुरातून मार्ग काढण्यासाठी नागरिकांची मानवी साखळी
गावालगतच्या नाल्याला पूर आल्याने एका शेतकऱ्याची ७५ हजार रुपयांची बैलजोडी ही वाहून गेली आहे. दरम्यान २००२ नंतर शुक्रवारी आलेल्या पावसाची नोंद ही १६० मिली मीटर एवढी करण्यात आहे. गावातील मध्यभागातून वाहणारा नाला तसेच भट्टीच्या नाल्याला प्रचंड पूर आल्याने रस्त्यालगतचा परिसर, कॉलनी, प्लॉट, इंदिरानगर झोपडपट्टी, बौद्ध पुरा, बस स्टॅन्ड मागील प्लॉट,ग्रामपंचायतचे आवार, मेडिकल लाईन, माळीपुरा, नाल्याच्या काठालगतची घरे व इतर रहिवासी भाग पूर्णत: पाण्यात बुडाला होता. येथील शेतकरी रामदास नारायणराव उपरीकर यांना पुराचा फटका बसला असुन त्यांची ७३ हजार रुपये किमतीची बैलजोडी पुरात वाहून गेली.