अमरावती - यावर्षी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. कपाशी, सोयाबिन आदी पिके हातातून गेल्यानंतर तूर पिकातून काही पैसे मिळतील, अशी शेतकऱ्यांना आशा होती. आधीच पावसाने तूर उत्पादनात कमालीची घट झाली. त्यात शासकीय तूर खरेदी सुरू झाली नसल्याने शेतकरी आपली तूर खासगी व्यापाऱ्यांना कवडी मोल भावात विकतानाचे चित्र पाहायला मिळत आहे.
फेब्रुवारी महिना सुरू असून अमरावती जिल्ह्यात एकही शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू झाले नाही. नाफेडच्या तूर खरेदीकेंद्र सुरू होईल आणि खासगी व्यापाऱ्यांपेक्षा चार पैसे जास्त मिळतील ही शेतकऱ्यांची अपेक्षा होती. अमरावती जिल्ह्यातील एकूण 5 केंद्रावर ही नाफेडची खरेदी केली जाते. ज्यामध्ये धारणी, तिवसा, अचलपूर, चांदुर रेल्वे आणि नांदगाव या पाच ठिकाणांचा समावेश आहे. पण, शासनाला तूर खरेदीला मुहूर्तच न मिळाल्याने शेतकरी संकटात आहे.
हेही वाचा - अमरावतीच्या शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन
जिल्ह्यात दरवर्षी हजारो क्विंटल तूर सरकार खरेदी करते. मागील वर्षी तबल 91 हजार क्विंटल तूर खरेदी केली होती. पण, यंदाच्या वर्षी तूर कापणी होऊन 15 दिवस झाले तरीही शासनाने एकही तुरीचा दाना खरेदी केला नाही. शासकीय बाजार भाव हा 5 हजार 800 रुपये आहे. पण, शासकीय खरेदी सुरूच न झाल्याने शेतकरी केवळ साडेचार ते पाच हजार रुपये प्रती क्विंटल एवढ्या दरात तूर विकतानाचे चित्र पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांच्या सुखदुःखात पाठिशी असण्याची घोषणा करणाऱ्या सरकारने आता तरी शेतकऱ्यांची तूर तत्काळ खरेदी करावी हीच शेतकऱ्यांची माफक अपेक्षा आहे.
हेही वाचा - पीकविमा सर्वेक्षणात घोळ; तलाठी, ग्रामसेवकावर कारवाईची मागणी