अमरावती Tiwasa Shankar Pat : अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे भारतीय जनता पार्टी आणि रविराज देशमुख मित्र परिवाराच्यावतीनं राज्यस्तरीय शंकरपट आयोजित करण्यात आला आहे. तिवसा शहरात बैलांसह शेतकऱ्यांची जणू यात्रा भरलीय असंच वाटतंय. शंकरपटात एकमेव महिला धुरकरी असणाऱ्या सीमा पाटील यांनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. सीमा पाटील या गेल्या 35 वर्षांपासून शंकरपटात सहभागच घेत जिंकूनही येतात. त्यामुळं त्यांचं कौतुक केलं जात आहे.
थरार आणि आनंद : आपल्या रुबाबदार बैल जोड्या घेऊन धुरकरी त्यांना शर्यतीत अतिशय वेगात पळवतो. त्यावेळी शंकरपट पाहणाऱ्यांचा प्रचंड आवाज शंकरपटाच्या परिसरात गुंजतो. निश्चित टार्गेट पूर्ण केल्यावरदेखील प्रचंड वेगात धावत असलेल्या बैलांना मोठ्या मुश्किलीनं थांबवण्याचा प्रयत्न धूरकरी करतात. हा संपूर्ण प्रसंग अतिशय थरारक असून धावत सुटणाऱ्या बैलांचा थरार पाहण्याचा आनंद नागरिक घेत आहेत.
सीमा पाटील एकमेव धुरकरी : तिवसा येथे महिलांसाठी आयोजित खास शंकरपटात बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सीमा पाटील या एकमेव धूरकरी महिला सहभागी झाल्या होत्या. त्या म्हणाल्या, 35 वर्षांपासून महिला धुरकरी म्हणून मी शंकरपटात सहभागी होते. आतापर्यंत मला 35 पारितोषिक मिळाले आहेत. तसंच तिवसा येथे रविराज देशमुख यांच्या वतीनं आयोजित शंकर पटात सहभागी होऊन बाजी मारल्याचा आनंद होत असल्याचंही सीमा पाटील यावेळी म्हणाल्या.
शेतकऱ्यांसाठी आनंद सोहळा : विदर्भातील शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत. बाराही महिने शेतकरी कष्ट करतात. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी आनंद सोहळा आयोजित करण्याच्या उद्देशानं आम्ही तिवसा येथे शंकरपटाचं आयोजन केलंय. हा शंकरपट म्हणजे शेतकऱ्यांसाठी सोहळा आहे. या सोहळ्यात तिवसा आणि लगतच्या गावातील दोन लाखांहून अधिक शेतकरी सहभागी झालेत याचा आम्हाला आनंद असल्याचं, भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष रविराज देशमुख ई टीव्ही भारतशी बोलताना म्हणाले.
70 हजारचे पहिले बक्षीस : या शंकरपटाचे २३ नोव्हेंबरपासून आयोजन करण्यात आले असून आज (२६ नोव्हेंबर) समारोप आहे. 100 मीटर अंतरच्या शंकरपटात अनेक जोड्या अवघ्या पाच ते सहा सेकंदामध्ये हे अंतर पूर्ण करतात. अतिशय दर्जेदार बैल जोड्या या शंकरपटात सहभागी झाल्यामुळं ही लढत चांगलीच अटी-तटीची आहे. या शंकरपटात सर्वात कमी वेळात बाजी मारणाऱ्या बैल जोडीला पहिलं बक्षीस 70 हजार रुपये, तर द्वितीय बक्षीस 50 हजार रुपये आणि तृतीय बक्षीस 40 हजार रुपये रोख दिले जाणार आहे. यासह चौथ्या क्रमांकासाठी 30 हजार रुपये, पाचव्या क्रमांकासाठी 20 हजार रुपये, सहाव्या क्रमांकासाठी पंधरा हजार रुपये, सातव्या क्रमांकासाठी दहा हजार रुपये, आठव्या क्रमांकासाठी 9 हजार रुपये, नवव्या क्रमांकासाठी 8 हजार रुपये, तर दहाव्या क्रमांकासाठी 7 हजार रुपये रोख अशी बक्षीसं आणि चषक दिलं जाणार आहे.
शासकीय योजनांचे स्टॉल : राज्यस्तरीय जंगी किसान शंकरपटा निमित्त तिवसा येथे राज्य शासन तसेच केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारे स्टॉलदेखील लावण्यात आलेत. या स्टॉलच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या अनेक योजनांची माहिती शेतकऱ्यांना दिली जात आहे.
हेही वाचा -