अमरावती - इतर शेतकऱ्यांन प्रमाणे आपल्या शेतातही संत्र्याची बाग असावी जणेकरून आपल्या कुटुंबाच्या पालन पोषणासाठी ती संत्रा बाग उपयोगाला येईल. शेतात विहरीत तेव्हा पाणी नव्हते म्हनून खचून गेलो नाही. गावातून ड्रम ने पाणी आणून मग अख्य कुटुंब रगरगत्या उन्हात डोक्यावर हंडा घेऊन संत्राच्या झाडाला पाणी टाकायचो आणि त्याच मुळे तबल ३०० झाडांची संत्रा बाग उभी केली. आज त्या बागेतील झाडे आठ वर्षाची झाली आता हळूहळू संत्राचे उत्पादन सुरू होणार होते, त्यामुळे पैसे येणार होते. अशी आशा पल्लवित झाली होती. मात्र, शुक्रवारी मध्यरात्री सोसाट्याचा वारा, अवकाळी पाऊस आणि एवढी कमी म्हणून की काय गारपीट आली आणि एका रात्रीत होत्याच नव्हते झाले. हे शब्द आहेत, तिवसा तालुक्यातील भारसवाडी या गावातील संत्रा उत्पादक शेतकरी रामेश्वर जगताप यांचे. शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या वादळी वारा गारपीट मुळे त्यांच्या संत्रा बागेतील जवळपास ४० झाडे उलमळून जमिनीवर पडली आहे. त्यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. संत्र्याचा बहार देखील गारपीटीमुळे गळुन पडला आहे. त्यामुळे आता सरकार व विमा कंपनीने तात्काळ मदत द्यावी अशी मागणी संत्रा उत्पादक शेतकरी रमेश जगताप यांनी केली आहे.
अवकाळी पावसाने हजारो क्विंटल कांदा सडणार -
याच गावातील शेतकरी गजानन जोरे यांनी आपल्या दोन एकर शेतात उन्हाळी कांद्याची लागवड केली होती. त्यासाठी त्यांनी 70 हजार रुपयांचा खर्च केला. आता कांदा काढायला आला होता कांदा काढून घेतला की लोकांचे उसनवार आणलेले पैसे देऊन देऊ असे स्वप्न त्यांनी पाहिले होते. मात्र, अचानकच आलेल्या अवकाळी पावसाने व गारपिटीने हातातोंडाशी आलेल्या कांद्याच्या पिकाला अक्षरशः झोडपून काढले आहे. शेतातील काढणीला आलेल्या कांद्याला गारपीटीचा मार बसल्याने कांद्याला आता सड सुरू झाली आहे. जो कांदा काढून वाढवण्यासाठी घातला होता तो कांदा आत्ता सडू लागला आहे. या वर्षी त्यांना दोन लाखांचे उत्पन्न होणार होते, असा अंदाज त्यांचा होता. मात्र, या अवकाळी पावसामुळे खर्च केलेले 70 हजार रुपये ही निघणार नाहीत अशी भीती आता त्यांच्यासमोर आहे. या नैसर्गिक सावटातून उभ राहण्यासाठी सरकारने मदत करावी अशी याचना ते करत आहे.
काढणीला आलेला गहू ही झोपला -
तिवसा तालुक्यातील शेंदूरजना बाजार येथील युवा शेतकरी पंकज चौधरी यांचे धामत्री परिसरात शेत आहे. त्यांनी यावर्षी आपल्या चार एकर शेतीत गहू पिकाची लागवड केली होती. मात्र, दोन दिवस दिवसात झालेल्या चक्रीवादळामुळे त्यांचा काढणीला आलेला गहू जमीनदोस्त झाला असून पूर्णपणे गहू झोपला आहे. त्यामुळे एक लाखांच्या वर त्यांचे नुकसान झाले आहे. आधीच खरीप हंगामातील सोयाबीन. कपाशी पीक हातातून गेल्याने शेतकऱ्यांची मदार रब्बी हंगामातील गहू व अन्य पिकांवर होती. मात्र, अवकाळी पाऊस आणि गारपिटीने जबर फटका बसल्याने रब्बी हंगामातील पिके शेतकऱ्यांच्या हातून गेल्याच पंकज चौधरी सांगतात.
अमरावती जिल्ह्यातील नऊ तालुक्यांना फटका -
18 मार्चला जिल्ह्यातील दर्यापूर, मेळघाट परिसरात तुफान गारपीट झाल्यानंतर शुक्रवारी सायंकाळच्या वेळी पुन्हा एकदा वादळी पाऊस व गारपिटीने अमरावती जिल्ह्याला झोडपून काढले. मुसळधार पावसामुळे काढून ठेवलेला हरभरा, काढणीला आलेला गहू , कांदे पावसात भिजले आहे. दोन दिवसांच्या या पावसाचा व वादळाचा अमरावती जिल्ह्यातील नऊ तालुक्याला तडाखा बसला आहे. या 9 तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवकाळी पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान केल आहे. उन्हाळ्यामध्ये घेतल्या जाणारा कांदा पिकांसह आंबिया बहरात आलेल्या सत्र्याचे देखील नुकसान झाले आहे. विदर्भात चोवीस तारखेपर्यंत पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.