अमरावती - लोकमान्य टिळकांनी आपल्या आयुष्यात ज्ञानहेतू आणि कर्महेतुला प्राधान्य दिले. ज्ञानशक्ती आणि कर्मशक्ती विकासासाठी प्रज्वलित करायची हा विकास व्यक्ती आणि समष्टीचा असावा हे टिळकांचे तत्त्वज्ञान होते. विकासातून ऐश्वर्य प्राप्ती होते. हे ऐश्वर्य म्हणजे मालकी हक्क सोडणे होय. यासाठी ऊर्जेची गरज आहे. ही ऊर्जा टिळकांच्या ठाई असल्याने ज्ञान आणि कर्म या दोन्ही शक्तीद्वारे त्यांनी आयुष्याचे ध्येय गाठले, असे मत नामवंत मनोविकासतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी व्यक्त केले.
आम्ही सारे फाऊंडेशन, मानस रुग्णालय आणि टोमोय स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात हेरिटेज व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. या व्याख्यानमालेत आज डॉ. आनंद नाडकर्णी यांनी 'लोकमान्यांकडून नेमके काय शिकावे' या विषयावर पुष्प गुंफले. यावेळी सभागृह खच्चून भरले होते.
टिळकांना गणित, संस्कृत आणि ट्रीग्नोमेंट्री लहानपणीपासून आवडीचे विषय होते. गणित पाटीवर नव्हे तर डोक्यात सोडवायचे असते असे ते म्हणत आणि करतही होते. लोकमान्य टिळक यांचे विलक्षण व्यक्तिमत्त्व आजही प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहे. वर्तमान आधुनिक युगात जगताना आपल्या जगण्यातून या देशासाठी आणि आपल्या समाधानासाठी काय सकारात्मक करता येईल, याची शिकवण लोकमान्यांचे विचार आणि व्यक्तिमत्त्वातून मिळते. त्यासाठी ज्ञान आणि कर्म यांची योग्य सांगड कशी घालावी हे समजण्यासाठी लोकमान्य टिळकांना आत्मसात करणे आवश्यक आहे.
जेव्हा विचारांचे प्रदूषण होते, आयुष्याची वाटचाल दिशाहीन होते, अशा अवस्थेत आदर्श विचारांच्या माध्यमातून परत एकदा सकारात्मक परिवर्तन साधता येते याची जाणीव लोकमान्यांच्या जीवन चरित्रातून होते. 1879 साली टिळक आणि आगरकर यांची मैत्री झाली. यावेळी समाजाने उद्योगाकडे वळावे असे टिळकांना वाटायला लागले आणि त्यांनी स्वतः तळेगाव इथे काचेचा कारखाना काढला. टिळकांनी मेळावे, कीर्तन, नाटक, चित्रपट याद्वारे आपले विचार समाजात पोहोचविण्याचे कार्य केले.
गणपती हा भारतातील सर्वच राज्यात सर्वाधिक पुजला जातो, म्हणून टिळकांनी गणपती उत्सव सुरू केला. थंड गोळा पडलेल्या देशात ऊर्जा निर्माण व्हावी यासाठी मोहरमही सार्वजनिक साजरा करण्यास टिळकांनी सुरुवात केली. आमचे सरकार सगळीकडे त्यांचे राजकारण आणत असेल तर आम्ही आमचे समाजकारण का आणू नये? असे टिळक म्हणत असत. आपले विचार मांडण्यासाठी टिळकांनी सुरुवातीला स्थानिक वृत्तपत्र काढले. त्यानंतर प्रादेशिक आणि पुढे राष्ट्रीय पातळीवर मजल मारली.
टिळकांवर राजद्रोहाचा दुसरा खटला 23 जून 1908 मध्ये भरण्यात आला. दुसऱ्या खटल्याच्या वेळी त्यांचे वकील मोहमद अली जिना हे होते. 24 जून 1908 ला टिळकांना अटक झाली. 25 आणि 26 जून या दोन्ही दिवशी त्यांची जामीन मंजूर झाली नाही. त्यानंतर 13 जुलै ते 22 जुलै खटला चालला. 22 जुलैला टिळकांनी आपल्या बचावासाठी बाजू मांडली त्यावेळी ते न्यायालयात 21 तास 10 मिनिटे बोलले. त्यांचे हे भाषण स्वतःचा सुटकेसाठी नव्हते तर लोकजागृतीसाठी होते. त्यांचे भाषण स्थानिक आणि परदेशातील वृत्तपत्रात त्यावेळी छापून आले होते. टिळकांना सहा वर्षाची शिक्षा झाली आणि पहिल्यांदा मुंबई सहा दिवस बंद झाली होती. मुंबई बंदची ही पहिली घटना होती, असे डॉ. नाडकर्णी यांनी सांगितले.
त्यावेळी टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. जून 1915 ला गीता रहस्याचे प्रकाशन झाले. त्या काळी पुण्यात गीतारहस्य जवळ बाळगणे ही फॅशन होती. स्वराज्य मिळावे यासाठी टिळक रोज 115 मैल प्रवास करून समाज प्रबोधन करायचे. टिळकांनी जी माती तयार केली होती त्या मातीत पुढे महात्मा गांधींनी आपल्या विचारांचे मूळ घट्ट रोवले. 1 ऑगस्ट 1920 ला टिळकांचे निधन झाले. त्यांच्या मृतदेहाला खांदा देण्यासाठी गांधीजी समोर आले. तेव्हा तुम्ही हलक्या जातीचे म्हणून दूर सारताच लोकसेवकाला जात नसते, असे म्हणत गांधींनी टिळकांना खांदा दिला. खऱ्या अर्थाने टिळकांनी 1920 पासून नवे पर्व गांधींच्या खांद्यांवर दिले, असे मत डॉ. नाडकर्णी यांनी व्यक्त केले.