अमरावती - अवैधरीत्या एका ओमनी गाडीतून देशी दारूची वाहतूक करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली. ही कारवाई वरुड तालुक्यातील बेनोडा पोलीस ठाण्यांतर्गत करण्यात आली. या कारवाईमध्ये २४ पेट्या देशी दारू व ओमनी गाडीसह तबल पावने दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान, प्रमोद रामकृष्ण श्रीराव (52) , प्रकाश रामदास कुरवाडे (20) व लता प्रमोद श्रीराव (45) रा. तिघेही शिंगोरी, असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहे.
अटक केलेल्यांमध्ये महिलेचादेखील समावेश -
वरुड तालुक्यातील शिंगोरी गावाजवळ अवैधरीत्या देशी दारूची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती ही बेनोडा पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून ओमनी गाडीतून एकूण 70 हजार 256 रुपये किंमतीची देशीदारू व एक ओमनी गाडी, असा एकूण पावने दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
मध्यप्रदेश मधूनही होते दारूची वाहतूक -
अमरावती जिल्ह्याला लागूनच मध्यप्रदेशची सीमा आहे. मध्यप्रदेशच्या सातपुडा जंगल भागात मोठ्या प्रमाणावर गावठी दारूचा व्यवसाय केला जातो. हीच दारू अवैधरीत्या वरुड-मोर्शी तालुक्यात आणून विकली जाते. दरम्यान काल रात्री केलेल्या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.
हेही वाचा - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : 'वनमंत्री संजय राठोड यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा'