अमरावती - शहरातील फारशी स्टॉप ते हरिगंगा ऑईलमील मार्गावरून जाणाऱ्या दोन स्कॉर्पियो गाड्यांमध्ये साडेतीन कोटी रुपये आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. गुप्त माहितीच्या आधारावर, राजापेठ पोलिसांनी केलेल्या कारवाईत हा प्रकार समोर आला.
अशी झाली कारवाई -
फारशी स्टॉप परिसरातुन हवालाची अवैध रक्कम नेली जात आल्याची माहिती सोमवारी रात्री राजापेठ पोलिसांना मिळाली होती. फारशी स्टॉप परिसरातील वीणा अपार्टमेंट येथून सकळी 6 वाजता एम.एच.18 बी.आर 1334 आणि एम.एच.20.डी.व्ही.5774 क्रमांकाच्या दोन स्कॉर्पियो गाड्या निघाल्या. दरम्यान, फरशी स्टॉप परिसरात राजापेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक मनीष ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक किसन मापारी, शिपाई दुलाराम देवकर, अतुल संभे, दानिश शेख, राहुल ढेंगेकार, अमोल खंडेझोड यांनी सापळा रचून दोन्ही स्कॉर्पियो गाड्या अडविल्या. या वाहनातील लोकांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्यावर पोलिसांनी दोन्ही गाड्या पोलीस ठाण्यात आणल्या. मॅकेनिकलला बोलावून पोलिसांनी दोन्ही गाड्यांची सीट उघडून पहिली असता त्यात मोठ्या प्रमाणात पैसा भरलेला दिसून आला.
हेही वाचा - राज्याला अतिवृष्टीचा १७०० कोटींचा फटका; सहा जिल्ह्यात आठ हजार व्यापाऱ्यांचे नुकसान
ताब्यात घेतलेल्या सहाजण गुजरातचे -
या प्रकरणात पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले. त्यापैकी वाहनात आलेल्या ज्या चार जणांना ताब्यात घेतले ते चौघेही गुजरात राज्यातील आहे. यामध्ये शिवदत्त गोहिल (30, रा. उना जिल्हा गिरसोमना), वाघेला सिलुजी जोराजी (49, रा. वसई जिल्हा पाटण) रामदेव राठोड(24, रा.सिमर जिल्हा गिरसोमना) नरेंद्र गोहिल (27, रा. राजुला जिल्हा अमरेली) अशी चौघांची नवे आहेत. हे चौघेही वाहन चालक आहेत.
या चौघांकडून माहिती मिळाल्यावर फारशी स्टॉप परिसरात वीणा अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या निलेश पटेल (27), आणि जिग्नेश गिरीगोसावी (26) यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. हे दोघेही मूळचे गुजरात राज्यातील मैसाणा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. हे गत दोघे वर्षभरापासून अमरावतीत राहत होते. त्यांच्या फ्लॅटवर रोख दीड लाख रुपये, 30 हजार रुपये किमतीच्या पैसे मोजण्याच्या मशीन, 3 अँड्रॉइड फोन पोलिसांनी जप्त केले असून साडेतीन कोटी रोखासह एकूण 3 कोटी 70 लाखाचा माल पोलिसांनी जप्त केला.
पोलीस आयुक्त म्हणतात.. -
या प्रकरणात पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी तपास सुरू असल्याचे म्हटले आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांचे पथक नागपूरवरून अमरावतीला येत आहे. आयकर विभागाकडून या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यावर हा प्रकार नेमका काय आहे? हे स्पष्ट होईल, असेही पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले.