अमरावती - विदर्भाची संत्री ही जगप्रसिद्ध आहे. परंतु, हा संत्रा पिकवणारा शेतकरी मात्र मागील अनेक वर्षांपासून संकटाच्या फेऱ्यात अडकला आहे. त्यामुळे संत्रा शेती संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. संत्राचे उत्पादन होत नसल्याने अचलपूर तालुक्यातील शेतकऱ्याने आपली पाचशे झाडांची संत्राची बाग मोकळी कली आहे. यंदा संत्रा खरेदी करण्यासाठी व्यापारी फिरकतच नसल्याने अमरावती जिल्ह्यातील अचलपूर परिसरातील अनेक संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील हजारो क्विंटल संत्रा रत्यावर आणून टाकला आहे.
जगप्रसिद्ध संत्रा रस्त्यावर फेकण्याची वेळ
अमरावती जिल्ह्यात हजारो हेक्टरवर संत्र्याच्या बागा आहेत. जिल्ह्यातील वरुड, मोर्शी, अचलपूर, अंजनगाव, परतवाडा, तिवसा, दर्यापूर, पथरोड यासह अनेक भागामध्ये संत्र्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात येते. नागपुरी संत्रा म्हणूनही हा संत्रा जगभरात प्रसिद्ध आहे. मात्र, यंदा हाच हजारो क्विंटल जगप्रसिद्ध संत्रा रस्त्यावर फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
संत्र्याला मोठ्या प्रमाणात गळती लागली
यंदा राज्यभर मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. विदर्भातही मधल्या काळात सतत पंधरा दिवस सूर्याचे दर्शनही झाले नाही. यामुळेच संत्र्याच्या देठावर बुरशीजन्य रोगाने हल्ला केला. संत्र्याला मोठ्या प्रमाणात गळती लागली. त्यात भर पडली ती पांदण रस्त्याची. शेतापासून मुख्य रस्त्यावर जाणारे पांदण रस्ते यंदाच्या पावसाने पूर्णता चिखलाने माखलेले आहेत. त्यामुळे शेतातील माल रस्त्यावर आणायचा कसा असा प्रश्न शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना पडला आहे. याच कालावधीत संत्राचे व्यापारीही शेत मालाकडे दुर्लक्ष करू लागले आहेत. अखेर संतापलेल्या शेतकऱ्यांनी आपला संत्रा रस्त्याच्या कडेला आणून फेकला आहे.
शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणारा संत्रा यंदा हातातून गेल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे. संत्राच्या पैशांवरच शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक गणित अवलंबून असते. मात्र, याच संस्थेने यंदा दगा दिल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोसळले आहे. महाविकास आघाडी सरकारने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना तत्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.
हेही वाचा - महिला शेतकरी आंदोलकांना ट्रकने चिरडले, तिघींचा मृत्यू