अमरावती - संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा जाणवत आहे. अमरावती जिल्ह्यातील तापमान ४७ अंश सेल्सिअसपर्यंत पोचले आहे. यामुळे सर्वसामान्य जनता हैराण झालेली आहे. वीज पुरवठा करणाऱ्या महावितरणसमोर आपले ट्रान्सफॉर्मर थंड ठेवण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.
ऐन उन्हाळ्यात उष्णतेमुळे हे ट्रान्सफॉर्मर बंद पडणार नाहीत आणि शहरातील विद्युत पुरवठा सुरळीत चालू राहील, यासाठी वीज वितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी एक अनोखी शक्कल लढवली आहे. अमरावती शहरात उन्हाचा पारा ४७ अंशावर गेला आहे. या उष्णतेमुळे शहरातील वीज पुरवठा सुरळीत राहावा यासाठी वीज विभाग प्रयत्न करीत आहे. अमरावतीच्या डफरीन हॉस्पिटल परिसरात असलेल्या पॉवर हाऊस येथील ३३ केवीच्या उपकेंद्रावरुन शहरातील मुख्य बाजारपेठेसह जवळपास २५ टक्के भागात वीज पुरवठा करण्यात येतो. त्यासाठी या उपकेंद्रात २ पॉवर ट्रान्सफॉर्मर लावण्यात आले आहेत. वाढत्या उष्णतेमुळे या ट्रान्सफॉर्मरच्या तापमानात वाढ होऊन ते बंद पडण्याची शक्यता असते. त्यासाठी या उपकेंद्रावरील अधिकाऱ्यांनी या ट्रान्सफॉर्मरला चक्क कुलरने हवा देऊन थंड ठेवण्याचा उपाय शोधला आहे. ट्रान्सफॉर्मरचे तापमान ७८ अंशाच्या पार गेले तर ते बंद पडण्याची शक्यता असते. ज्यामुळे वीज पुरवठा खंडित होतो. मात्र, अशाप्रकारे कुलर लावून या ट्रान्सफॉर्मरचे तापमान ५६ अंशांपर्यंत ठेवण्यात या प्रयोगामुळे यश आले आहे.