अमरावती - मला मुक्तता द्या, मी आत्महत्या करत आहे, अशी उपजिल्हाधिकारी राम लंके यांना विनंती करणारा एका अधिकाऱ्याची ओडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या अधिकाऱ्याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. प्रमोद निंबोरकर असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. ते तिवसा पंचायत समितीमध्ये रोजगार हमी योजना विभागात कंत्राटी म्हणून कार्यरत होते.
कार्यमुक्त केल्याने आत्महत्या करत असल्याचे तांत्रिक अधिकारी प्रमोद निंबोरकर यांनी रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी राम लंके यांना फोनवरून सांगितले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी या अधिकाऱ्याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. मात्र, हा अपघात की तणावाखाली येऊन आत्महत्या असा प्रश्न निर्माण झाला आहे. मृत्यूपूर्वी प्रमोद निंबोरकर यांनी उपजिल्हाधिकारी राम लंके यांना फोन करून आपली व्यथा मांडली होती. आपल्याला तिवसा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. चेतन जाधव हे सिंचन विहिरीच्या प्रत्येक फाईलमागे पाच हजार रुपये गोळा करण्यास सांगत असल्याचा गंभीर आरोपदेखील प्रमोद निंबोरकर यांनी केला होता. उपजिल्हाधिकारी राम लंके यांच्याशी फोन वर रडत-रडत व्यथा सांगितल्याच्या ओडिओ क्लिपमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा-अमरावतीमधील 'ते' प्रकरण : अनुसूचित जातीतील पीडितांच्या खात्यात थेट नुकसान भरपाई रक्कम जमा होणार
आत्महत्या की अपघाती मृत्यू?
अमरावतीच्या वरुड तालुक्यातील प्रमोद भिमरावजी निंबोरकर हे पंचायत समिती तिवसा येथील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना विभागात तांत्रिक अधिकारी म्हणुन कार्यरत होते. दरम्यानच्या काळात पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डाॅ. चेतन जाधव यांनी प्रमोद निंबोरकर यांच्या कार्यमुक्तीचा प्रस्ताव रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी राम लंके यांना पाठविला होता. उपजिल्हाधिकारी राम लंके यांनीही कुठलीही शहानीशा न करता व बाजू मांडण्याची संधी दिली नसल्याचा दावा निंबोरकर यांनी केला होता. वरुडच्या बेनोडा पोलीस स्टेशन अंतर्गत मोर्शि ते वरुड रोडवर प्रमोद निंबोरकर यांचा रात्री अपघात झाला आहे. दरम्यान निंबोरकर यांच्या मृत्यूने अपघात की आत्महत्या ?असा प्रश्न निर्माण झाला आहे.
हेही वाचा-सायकल पंचर होते म्हणून 'हा' पठ्या चक्क घोड्यावरून जातो शाळेत, वाचा...
काय आहे त्या ऑडिओ क्लीपमध्ये?
मृत्यूपूर्वी प्रमोद निंबोरकर यांनी रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी राम लंके यांना फोन केला. त्यामध्ये तिवसाचे गटविकास अधिकारी डॉ. चेतन जाधव यांनी कसा अन्याय केला याचा पाढाच वाचला. आपली चूक नसतानादेखील हेतुपुरस्सर आपल्यावर कारवाई केल्याचे निंबुरकर यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना फोनवर सांगितले आहे.
हेही वाचा-क्रूझ पार्टी प्रकरण : कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही - गृहराज्यमंत्री सतेज पाटील
प्रमोद निंबोरकर यांनी ओडिओ क्लिमध्ये काय म्हटले आहे?
प्रमोद निंबोरकर यांच्या व्हिडिओ क्लिपमध्ये त्यांनी कैफियत मांडली होती. त्यांनी म्हटले होते, की मी कोणता भ्रष्टाचार केला नाही. मी कोणतीही चूक केली नाही. मी सरकारची चौकट तोडली नाही. परंतु माझ्यावर झालेला अत्याचार मी अत्याचार कधी सहन केला नाही. मी कामात हुशार होतो. माझ्यावर कुठलाही आरोप नसताना माझ्यावर अत्याचार झाला. साहेब, तुम्ही माझी चौकशी न करता मला कामावरून कसे कमी केले. बीडिओ मला म्हणत आहे, मला सिंचन विहिरीच्या एका फाईलचे पाच हजार रुपये द्या. मी कुठून देऊ? मला 4 वेळा केबिनमध्ये चेतन जाधव साहेबांनी बोलावले. माझे ऑपरेशन झाले. माझे पगार काढले नाही. तुम्ही माझी कुठलीही चुक नसताना जिल्हाधिकाऱ्यांची सही घेऊन कार्यमुक्त केले. मला संधी का दिली नाही?
न्याय मागण्यासाठी अपील करण्याचाही सल्ला
या कथित ऑडिओ क्लिप संदर्भात रोजगार हमीचे उपजिल्हाधिकारी राम लंके यांना प्रतिक्रिया विचारली. यासंदर्भात ते म्हणाले की, कामात अनियमितता असल्याने बीडिओ यांनी दिलेल्या कार्यमुक्तीचा प्रस्ताव माझ्याकडे आला होता. त्यानुसार त्यावर मी सही करून तो प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनादेखील पाठविला होता. आत्महत्या करू नको, असे मी त्याना वारंवार सांगितले. त्यांनी आत्महत्या केली नाही. त्यांचा अपघात झालेला आहे. त्यांना न्याय मागण्यासाठी अपील करण्याचाही सल्ला आम्ही दिला होता. तशी प्रक्रिया ही सुरू झाली होती.
दरम्यान, गटविकास अधिकारी डॉक्टर चेतन जाधव यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांना फोन केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
कार्यमुक्त केलेल्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी-
तिवसा युवासेनेचे तालुका प्रमुख आशिष ग. निस्ताने म्हणाले, की प्रमोद निंबोरकर यांनी सगळीकडे दाद मागितली असता न्याय मिळाला नाही. त्यानंतर परिस्थिती समोर हतबल होऊन त्यांनी उपजिल्हाधिकारी राम लंके यांच्याशी फोनवरून चर्चा केली. अधिकारी यांच्या त्रासाला कंटाळून त्यांचा आत्महत्या करण्याचा मानस होता, असे रेकॉर्डिंगवरून निष्पन्न होते. परंतु प्रमोद निंबोरकर, त्यांच्या पत्नी व त्यांचा मुलगा यांना न्याय मिळण्याकरीता कार्यमुक्त केलेल्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. संबंधित दोषींवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी निस्ताने यांनी केली आहे.