अमरावती - कोरोनाने मृत्यू झालेल्या मृतदेहांची होत असलेली अवेहला आपण सर्वांनी पाहिली आहे. अनेक ठिकाणी आरोग्य यंत्रणा कशी गाफील होत आहे, याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी कोविड रुग्णालयात देखील असाच प्रकार घडला आहे. याठिकाणी उपचार घेणारा एक कोरोनाबाधित रूग्ण गायब झाला होता. रूग्णालयापासून काही अंतरावर त्याचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. यावरून आपली आरोग्य यंत्रणा सतर्क आहे, असा प्रश्न निर्माण होत आहे.
काय आहे प्रकरण -
अमरावती जिल्ह्यातील आजनगाव येथील 65 वर्षीय किसन झोरे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. २४ एप्रिलला त्यांना अमरावती येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. हा रूग्ण 25 एप्रिलला सकाळी 10 वाजता दरम्यान अमरावती शहरातील सिद्धार्थनगर परिसरात पोलिसांना मृतावस्थेत आढळला. पोलिसांनी पंचनामा करून आकस्मित मृत्यूची नोंद करून घेतली. नातेवाईकांकडून ओळख पटल्यानंतर हा रूग्ण पॉझिटिव्ह वार्डमध्ये भरती असल्याची माहिती समोर आली. रूग्णालयातून हा रूग्ण बाहेर कसा आला? हा प्रश्न उपस्थित झाला आहे आहे.
रूग्णालयातून रूग्ण बाहेर गेलाच कसा -
ओळख पटवण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांना पोलिसांचा फोन आल्यानंतर नातेवाईकांना हा प्रकार माहिती झाला. त्यांनी तात्काळ सुपर स्पेशालिटी रुग्णालयात याबाबत विचारणा केली. तुमच्या रूग्णावर उपचार सुरू असल्याचे रूग्णालय प्रशासनाने सांगितले. ज्या वेळी माध्यमांनी विचारणा केली तेव्हा डॉक्टरांनी रूग्ण मीसिंग असल्याचे सांगितले. तशी तक्रार सुद्धा पोलिसात दिल्याचे सांगितले. यावरून रूग्णालय प्रशासनाची दुटप्पी भूमिका आणि भोंगळ कारभार दिसून येतो.
हेही वाचा - अंबाजोगाईत कोरोनाचे मृत्यू तांडव; 48 तासात 30 जणांचा बळी