अमरावती - जिल्ह्यात आजपासून शासकीय वृक्षारोपण कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. त्याचे उद्घाटन चांदूररेल्वे तालुक्यातील सावंगा विठोबा आणि चारोडी गावात करण्यात आले. यावेळी २७ हजार ७७५ वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्यावतीने ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी गेल्या आठवड्यापासून तालुक्यातील वनपरिक्षेत्र अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी या वृक्ष लागवड मोहिमेची तयारी करीत होते. त्यानुसार आज वृक्षलागवडीचा कार्यक्रम घेण्यात आला. त्याद्वारे सागवान, वड, पिंपळ, चिंच, बिहा, मोहा, आवळा, सेमल, पापडा, बांबू, बोर, बेल, व कवट अशा अनेक प्रजातीच्या रोपट्यांची लागवड करण्यात आली. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाने, विभागीय आयुक्त पियुष सिंग, जिल्हाधिकारी शैलेश नवाल यासह अनेक अधिकाऱ्यांची उपस्थित होती. तसेच यामध्ये विविध महाविद्यालय आणि शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. एक व्यक्ती एक झाड असा संकल्प यावेळी उपस्थित सर्व मान्यवर आणि विद्यार्थ्यांनी घेतला.
प्रत्येकाला जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःच एक झाड लावले पाहिजे. त्यासाठी शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमात प्रत्येकाने सहभागी व्हायला पाहिजे. तसेच एक झाड लावण्याचा नव्हे तर ते जगण्याचा संकल्प प्रत्येक नागरिकांनी करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले.
जिल्ह्यासह तालुक्याची परिस्थिती पहिली तर प्रचंड दुष्काळ पहायला मिळते. यावर उपाय म्हणून जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी किमान एक झाड लावून ते जगवण्याचा संकल्प करावा, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी यावेळी केले.