अमरावती - गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर आता विदर्भात पुढील चार दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. यावेळी तापमान 45 अंशाच्या पुढे जाणार असल्याचा अंदाज अमरावतीच्या श्री शिवाजी कृषी महाविद्यालयातील हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे, काम नसल्यास घराबाहेर न पडण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
सध्याच्या परिस्थितीमध्ये पश्चिम हिमालय, पंजाब, राजस्थान तसेच लगतच्या काही भागांमध्ये पाऊस नसल्याने तेथील वातावरण उष्ण झाले आहे. त्यामुळे वारे हे जमिनीलगत वाहत आहेत. ते वारे मध्य प्रदेश मार्गे महाराष्ट्र व विदर्भात येत असल्याने येथील तापमान वाढत आहे.
पुढील चार दिवस विदर्भातील अनेक ठिकाणी उष्णतेची लाट येणार असून दुपारचे तापमान 45 अंशाच्या पुढे जाऊ शकते. 25 तारखेपर्यंत विदर्भातील उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ डॉ अनिल बंड यांनी व्यक्त केला आहे.