अमरावती - उन्हाळ्याच्या लांब सुट्ट्या संपून २६ जूनला विदर्भातील सर्व शाळांची सुरुवात झाली. वाई बोथ गावातील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेच्या पहिला दिवस शिक्षकांनी वेगळ्या पद्धतीने साजरा करायचा ठरविले. ही कल्पना शिक्षकांनी गावकऱ्यांसमोर मांडली. आणि बघता-बघता पूर्ण गावाचा कायापलट होऊन जणू प्रति पंढरपूर अवतरल्याचे हे दृष्य पाहायला मिळाले. शाळेत प्रवेश घेणाऱ्या प्रवेशपात्र विद्यार्थ्यांना सजावट केलेल्या बैलबंडीत बसविले. व गावातून पुस्तक पालखी काढण्यात आली. शाळेतील हा पहिला दिवस अशा प्रकारे मोठ्या उत्साह व थाटामाटात साजरा करण्यात आला.
अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा वाई बोथ गाव येथील विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशाचा पहिला दिवस होता. गावात प्रत्येक अंगणासमोर रांगोळी, प्रत्येक घरासमोर पाट पडलेला, कुठे गजानन महाराजांचा फोटो तर कुठे समाज मंदिरासमोर महिला स्वागतासाठी सज्ज दिसत होत्या. बैल सुद्धा सजलेले, फुगे व हारांच्या आरासात मुलांची चहलपहल होती. बघता बघता टाळ मृदुंगाच्या निनादात सर्व गावं तल्लीन झाली होती. कुठे भीमगीते, तर कुठे चक्क महिलांचा फुगडीचा फेर दिसत होता. जणू वाई बोथ गावात आषाढी एकादशी सारखे प्रति पंढरपूरच अवतरल्याच चित्र होते.
एकीकडे प्रथमच उन्हाळा लांबलेला आणि अचानक अगोदरच्या दिवशी झालेल्या पावसामुळे गावकरी सुखावले होते. चांदूर रेल्वे तालुक्यातील वाई बोथ येथील शिक्षकांनी शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा प्रवेश शुभारंभ वेगळेपणाने साजरा करण्याचा मनोदय व्यक्त केला. गेल्या वर्षभरातील शाळेतील भौतिक व शैक्षणिक परिस्थितीत झालेल्या आमुलाग्र बदलामुळे गावकऱ्यांनी एकमताने आम्ही सर्व सहभागी होणार असल्याचे सांगितले.
सकाळीच सर्व प्रवेशपात्र मुली गुलाबी लुगड्याचा पोशाखात सजलेल्या होत्या. त्यात शाहू महाराज यांच्या जयंती (सामाजिक न्याय दिन) व जिजाऊ माता पुण्यतिथी असल्यामुळे विद्यार्थ्यी शाहू महाराज, जिजाऊ महाराज, गाडगे महाराज, सावित्रीबाई फुले आणि विठ्ठल रुख्मिणी च्या वेशात नटलेले होते. गावकऱ्यांनी स्वतः बैलबंडीची सजावट करत त्या मध्ये प्रवेशपात्र मुलांना बसविले. पालकांनी पालखी तयार करून त्यात विठ्ठल रुख्मिणी च्या प्रतीमेसह पुस्तकांची सजावट केली होती. गावातील भजनी मंडळींच्या पताका व टाळ-मृदुंगच्या निनादात गावकरी एकरूप झाले होते. सरपंच सुनीताताई शेळके व शाळा व्यवस्थापन समिती प्रमुख भारतीताई चौधरी यांनी सुद्धा पालखीला खांदा देत प्रदक्षिणेत पुढाकार घेतला. गावात प्रत्येक घरासमोर पालखी धारकांचे पायांची पूजा करण्यात आली.
पालखी विठ्ठल रुख्मिणी मंदिरात नेण्यात आली. दर्शनानंतर आंबेडकर नगरातील वयस्क महिलांनी भिमगीते गाऊन मुलांचा उत्साह द्विगुणीत केला. अखेर शाळेत पालखीच्या अंतिम चरणात मुलींसह महिलांनीही फुगडीचा फेर धरत भजनाच्या आसमंतात कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वितरण करण्यात आले. शाळा प्रवेशाच्या कार्यक्रमाला गावातील सरपंच सुनीता शेळके, शाळा व्यवस्थापन समिती प्रमुख भारती चौधरी यांसह शिक्षक व गावातील शेकडो नागरिक सहभागी झाले होते. शाळा प्रवेशाच्या या उपक्रमामुळे प्रत्येक गावकऱ्यांना प्रति पंढरपूर चा अनुभव येत होता.