अमरावती - सध्या संपूर्ण देशभर महिला आणि युवतींच्या सुरक्षेचा प्रश्न संवेदनशील बनला आहे. अशात संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने 'खेलो इंडिया' स्पर्धेकरिता विद्यापीठाच्या महिला कुस्तीपटूचा प्रशिक्षक म्हणून विनयभंगासारखा गंभीर गुन्हला असलेल्या आरोपीची नेमणूक केली आहे. भुवनेश्वर येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
विद्यापीठाने केलेल्या या गंभीर चुकीमुळे शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे. प्रा.मनोज तायडे असे विनयभंगाचा गुन्हा दाखल असलेल्या कुस्ती प्रशिक्षकाचे नाव आहे. तायडे यांच्याविरुद्ध गाडगेनगर पोलीस ठाण्यात एका कुस्तीपटू युवतीने 20 जानेवारीला विनयभंग केल्याची तक्रार दिली होती. पोलिसांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेत मनोज तायडे विरुद्ध 25 जानेवारीला गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती.
न्यायालयाने त्याला जामिनावर मुक्त केले आहे. प्रा.मनोज तायडे चिखलदरा येथील गिरिजन शारीरिक शिक्षण महाविद्यालयात प्राध्यापक आहे. काही दिवसांपुर्वी ग्रामीण भागातील एक कुस्तीपटू युवती कुस्तीचे प्रशिक्षण घेण्यासाठी अमरावतीत आली होती. कुस्तीचे प्रशिक्षण घेत असताना तायडे आपल्यासोबत काहीतरी चुकीचे करतो आहे, हे लक्षात येताच सदर युवतीने गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.
ही घटना गाजली असतानाच अमरावती विद्यापीठाने मनोज तायडे यांची खेलो इंडिया या स्पर्धेकरिता महिला कुस्तीपटूंचा प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली. हा विषय सध्या चांगलाच तापला आहे. दरम्यान, या संदर्भात शारीरिक शिक्षण मंडळाचे सदस्य प्राध्यापक प्रदीप खेडकर यांनी याबाबत मी स्पष्टीकरण देतो , असे सांगितले. यानंतर, काही पत्रकारांना सोमवारी सायंकाळी विद्यापीठात बोलावून सुमारे दोन ते अडीच तास वाट पाहायला लावली आणि स्वतः मात्र पळ काढला. शारीरिक शिक्षण मंडळाच्या सदस्यांच्या अशा वागणुकीमुळे या गंभीर प्रकरणात अशा सदस्यांची नेमकी काय भूमिका असेल, असा प्रश्न निर्माण होतो.
या गंभीर विषयासंदर्भात विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. राजेश जयपुरकर यांनी म्हटले, हा विषय आमच्या समोर आता आला आहे. याबाबत आम्ही मनोज तायडे यांच्या गिरिजन महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे माहिती विचारली असून दोन दिवसात त्यांना ही माहिती सादर करावी लागणार आहे. या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर निश्चितच कारवाई होईल, असे त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना स्पष्ट केले.
शारीरिक शिक्षण मंडळाची ही आहे निवड समिती -
कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, अध्यक्ष प्रा.मनोज तायडे , सदस्य (आरोपी) प्रा.प्रदीप खेडक, सदस्य प्रा.धनंजय वेरुळकर, नागपूर, सदस्य प्रा.प्रमोद चांदुरकर, सदस्य क्रीडा पत्रकार लोखंडे, नागपुर, सदस्य प्रा.डॉ. तनुजा राऊत, सदस्य (विभाग प्रमुख शारीरिक शिक्षण विभाग अमरावती विद्यापीठ). या निवड समितीने ज्यांची प्रशिक्षक म्हणून निवड केली त्या प्रशिक्षकाला नियुक्तीचे पत्र देण्याची जबाबदारी शारीरिक शिक्षण मंडळाचे सचिव म्हणून विद्यापीठाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. अविनाश असनारे यांच्याकडे आहे.