अमरावती - अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना चार दिवसांपूर्वी शिवसेनेच्या कथित लेटर हेडवरून चेहऱ्यावर अॅसिड फेकण्याची तसेच जीवे मारण्याची धमकी देणार पत्र आले होते. या धमकी पत्रानंतर आज युवा स्वाभिमान पार्टीच्यावतीने अमरावतीतील जयस्तंभ चौकातील महात्मा गांधीच्या पुतळा समोरून गांधीचा मार्ग अवलंबत करत घोषणाबाजी केली. तसेच पत्र पाठवणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी यावेळी युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यंकडून करण्यात आली.
अमरावतीच्या जयस्तंभ चौकात आंदोनल -
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना खासदार नवनीत राणा यांनी राज्य सरकार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कारभारावर टीका केली होती. त्यानंतर चार दिवसांपूर्वी खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देणारे एक पत्र शिवसेनेच्या लेटरहेडसह आले होते. या पत्रात खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांना मारण्याची धमकी देण्यात आली होती. तसेच या पत्रात अर्वाच्च भाषेचाही वापर करण्यात आला होता. त्यानंतर खासदार नवनीत राणा यांनी दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल केली होती. दरम्यान, आज खासदार नवनीत राणा यांच्या समर्थनार्थ युवा स्वाभिमान पार्टीच्यावतीने अमरावतीच्या जयस्तंभ चौकात या घटनेचा निषेध करण्यात आला.
पोलिसांचा तगडा बंदोबस्त -
सद्या अमरावतीत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अमरावती शहरात जमावबंदी कायदा लागू असताना सुद्धा खासदार नवनीत राणा यांच्या समर्थनार्थ शेकडो कार्यकर्ते जमले होते. यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता.