अमरावती - सफाई कर्मचाऱ्याने राजीनामा दिल्यानंतर महापालिकेकडून त्याच्या मुलाला नोकरी देण्यात आली. मात्र, मुलाला दिलेली नोकरी मान्य नसून पत्नीला नोकरी द्या, अशी मागणी त्या सफाई कर्मचाऱ्याने केली. यासाठी आज त्याने महापालिकेत गोंधळ घातला.
संजय चावरे, असे या सफाई कर्मचाऱ्याचे नाव असून ते मासानगंज परिसरात राहतात. बुधवारी संजय चावरे पत्नी आणि मुलासह महापालिकेत आले. महापालिकेचे उपायुक्त सुरेश पाटील यांच्या दालनात त्यांनी शिरण्याचा प्रयत्न करत गोंधळ घातला. यावेळी महापालिकेत आधीच तैनात असणाऱ्या पोलिसांनी संजय चावरे यांना शांत राहण्यास सांगितले. बराच वेळ ते पत्नी आणि लहान मुलासह उपयुक्तांचा दालनाबाहेर बसून उपयुक्तांवर पैसे खाण्याचा आरोप करत होते. या संपूर्ण प्रकरणाबाबत संजय चवरे यांच्याकडून माहिती घेतली असता त्यांनी मी 14 वर्षापूर्वी दुसरे लग्न केले. आज मी राजीनामा दिला असल्याने नियमानुसार वारस म्हणून माझ्या जागेवर माझ्या पत्नीला नोकरी मिळणे अपेक्षित होते. असे असताना माझा पहिल्या पत्नीपासून प्राप्त मुलाला उपायुक्तांनी पैसे घेऊन नौकरी दिली, असा आरोप त्यांनी केला.
उपयुक्तांचा दालनासमोर संजय चावरे यांचा गोंधळ वाढल्यामुळे शहर कोतवाली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. हा सर्व गोंधळ जवळपास तासभर सुरू होता.