अमरावती - कोरोनामुळे गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेल्या राज्यातील शाळा येत्या २३ नोव्हेंबरला सुरू होणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती. त्यानंतर आता वर्ग ९ वी ते ११वी पर्यंतच्या शाळा सुरू होणार असल्याने शिक्षकांना कोरोना चाचणी करून घेणे अनिवार्य आहे. या पार्श्वभूमीवर अमरावतीमधील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या शिक्षकांच्या लांब रांगा पाहायला मिळाल्या. तसेच, शिक्षिकांनी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवल्याचे दिसून आहे.
शिक्षणमंत्र्यांची आडमुठी भूमिका वादाच्या भोवऱ्यात
राज्यात शहरी आणि ग्रामीण भागात अद्यापही कोरोनाचा धोका टळलेला नाही. अशातच शालेय शिक्षणमंत्री गायकवाड यांनी मात्र शाळा सुरू करण्याची घेतलेली आडमुठी भूमिका पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मुंबई, ठाणे महापालिकेने आपल्या क्षेत्रातील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत सुरू करू शकत नाही, अशी भूमिका घेतल्याने शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा सुरू करण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून निर्णय घेतला जाईल, असे स्पष्टीकरण दिले. मात्र, विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण सुरू राहाणार असून भविष्यात शाळा सुरू करताना स्थानिक शिक्षणाधिकारी, जिल्हाधिकारी, शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असेही गायकवाड यांनी सांगितले.
हेही वाचा - अमरावतीत एकाच रात्रीत रेतीचे 9 ट्रक ताब्यात; आयपीएस अधिकाऱ्याची 'धडक'