अमरावती - चांदूर रेल्वे मधील एका महाविद्यालयातील विद्यार्थीनींना व्हॅलेंटाइन-डे च्या निमित्ताने प्रेमविवाह न करण्याची शपथ प्राध्यापकांनी दिली होती. यानंतर संबंधित प्रकरणावर सर्व स्तरांतून प्रतिक्रिया उमटल्या होत्या. तसेच शपथ घेण्यास प्रवृत्त करणाऱ्या प्रचार्यांसह अन्य तिघांचे निलंबन झाले.
मात्र, शपथ घेतल्यानंतर फक्त पंधरा दिवसातच या महाविद्यालयातील एका विद्यार्थीनीने प्रियकरासोबत पळून जाऊन प्रेम विवाह केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मुलीच्या पालकांनी चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
काय होते प्रकरण?
चांदूर रेल्वे येथील महिला कला वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींना प्राध्यापकांनी प्रेम व प्रेमविवाह न करण्याची शपथ देण्यात आली. टेंभूर्णीत पार पडलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबीरात घडलेला संबंधित प्रकार उघडकीस आल्यानंतर प्राचार्य डॉ. राजेंद्र हावरे, प्रा. प्रदीप दंदे व रासेयो कार्यक्रम अधिकारी विजय कापसे यांचे निलंबन करण्यात आले. यानंतर प्राध्यापकांचे निलंबन मागे घेण्यासाठी विद्यार्थीनींनी तासिकांवर बहिष्कार घातला. तसेच या प्रकरणाचा निषेध देखील नोंदवला.
दरम्यान, या प्रकारणाची चर्चा थंड होत असतानाच याच महाविद्यायातील एका 19 वर्षाच्या मुलीने प्रियकरासोबत पळून जाऊन विवाह केल्याचे समोर आले आहे