अमरावती- मातृभाषेत शिक्षण मिळावे हा सर्व विद्यार्थ्यांचा मूलभूत अधिकार आहे. मेळघाटातील विद्यार्थ्यांना मात्र त्यांच्या कोरकू भाषेत शिकवण्यासाठी लिपी उपलब्ध नाही. शिक्षकही नाहीत. यामुळे मराठी भाषा आत्मसात केल्याशिवाय त्यांना पर्याय नाही. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना साधी अक्षर ओळखही होत नाही. त्यामुळे दहिंडा येथील जीवन विकास विद्यालयाच्या शिक्षकांनी अशा विद्यार्थ्यांना अक्षर ओळख व्हावी, यासाठी आनंददायी शिक्षण हा आगळावेगळा उपक्रम राबविला आहे.
हेही वाचा- विद्यापीठातील अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणवरून उच्च शिक्षणमंत्र्यांनी कुलगुरुंना झापले !
मेळघाटातील आदिवासींच्या मुलांना शिक्षण देणे हे अतिशय कठीण आहे. जिल्हा परिषदेच्या काही शाळांमधील शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवण्याचे प्रामाणिक प्रयत्न करतात. मात्र, अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना साधी अक्षर ओळखही करून दिली जात नसल्याचे वास्तव आहे. धारणी पासून काही अंतरावर असणाऱ्या दहिंडा या गावातील जीवन विकास माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना बाराखडी शिकविण्यासह अक्षर ओळख व्हावी यासाठी आनंददायी शिक्षण हा खास उपक्रम राबविला जात आहे.
शाळेचे मुख्याध्यापक संजय लायदे यांनी शाळेत शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची पातळी ओळखून आनंददायी शिक्षणाची संकल्पना वास्तवात आणली. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अभ्यासक्रमाव्यतिरिक्त प्राथमिक शिक्षणाचे धडे देण्यासाठी या शाळेत विशेष वर्ग घेण्यात येतात. या वर्गामध्ये पाचवी ते सातवी आणि आठवी, नववीच्या विद्यार्थ्यांना बसवून त्यांना अक्षर ओळख करून देणे, शब्द कसे तयार करायचे, ते कसे वाचायचे याचे धडे दिले जातात. मेळघाटातील बहुसंख्य आदिवासींची भाषा ही कोरकू आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अनेक शिक्षक पुढच्या इयत्तेत ढकलत-ढकलत या मुलांना पहिलीतून चौथीत आणतात. इयत्ता पाचवी पासून पुढे शिक्षण घेताना या विद्यार्थ्यांना साधी अक्षरओळखही नसल्यामुळे त्यांच्या शिक्षकांना कठीण प्रसंगाची सामना करावा लागतो.
आनंददायी अभ्यासक्रम हा आगळावेगळा उपक्रम शिक्षकांसाठी थोडासा किचकट आणि क्लेशदायक आहे. मात्र, विद्यार्थ्यांना अक्षर ओळख करून देण्याचा महत्त्वाचा प्रयत्न यातून होत आहे. शासनाने मेळघाटातील शिक्षणाकडे सकारात्मक दृष्टीने विचार केला तर या भागातील शिक्षणासह अनेक प्रश्न सुटू शकतात. शासनाकडून असे प्रयत्न केले गेले तर मेळघाटातील विद्यार्थ्यांचे भवितव्य निश्चितच उजळू शकते.