अमरावती- देशासह राज्यात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. यावर खबरदारीचा उपाय म्हणून देशात १४ एप्रिलपर्यंत सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. अशावेळी सुरक्षा यंत्रणा, वैद्यकीय कर्माचारी कोरोनाच्या निर्मूलनासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमवीर जिल्ह्यातील आमदावर व मंत्री बच्चू कडू देखील कोरोना निर्मूलन कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्यात दौरे करत होते. या दरम्यान त्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचा संशय आला. त्यानंतर सलग तीन दिवस विलगीकरणात असताना त्यांना आपल्याला डोळ्यासमोर मृत्यू दिसत होता, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी एका पत्रातून व्यक्त केली आहे.
मी पूर्णतः हादरलो होतो. पहिल्यांदाच खचलो. मला माझा मुलगा देव, पत्नी नयना यांची काळजी वाटायला लागली. पहिल्यांदाच या दोघांना सोडून घरात एकटाच झोपण्याची वेळ माझ्यावर आली. माझ्यामुळे माझे अनेक कार्यकर्ते संकटात सापडतील की काय? माझ्या संपर्कात आलेल्यांवर मी मोठा अन्याय केला असता, असे अनेक प्रश्न माझ्या मनात घोळत होते, मला सतावत होते. सलग तीन दिवस मी माझा मृत्यू समोर पहात होतो. माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असता तर, खूप वाईट झाले असते, असे दुःख राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सर्व जनतेला उद्देशून आपल्या पत्रात लिहिले आहे.
'कोरोनाचे लक्षण असल्याचे वाटत होते'
कोरोनाचा प्रसार भारतात होत असताना मंत्री बच्चू कडू यांना आपल्यातही कोरोनाचे लक्षणे आहेत, असे वाटत होते. आपल्याला कोरोनाची लागण झाली तर मोठी आफत येईल. आपण रोज घराबाहेर पडतो, अनेक लोकांना भेटतो, आपल्यामुळे इतर अनेकांचा बळी जाईल, अशी भीती बच्चू कडू यांना वाटत होती. नुकतीच दहावीची परीक्षा देणारा देवा या बच्चू कडू यांच्या मुलाने त्यांना काळजी घ्या, बाहेर फिरू नका, असे वारंवार सांगूनही त्याच्या बोलण्याकडे आपण दुर्लक्ष केले. ही मोठी चूक झाल्याचे आपल्या मनाला सतत वाटत असल्याचा उल्लेखही बच्चू कडू यांनी या पत्रात केला आहे.
डॉक्टरांच्या अहवालानंतर बच्चू कडू खचले
घरच्यांची नाराजी घेत अकोला, अचलपूर, चांदूरबाजार येथे कोरोना निर्मूलन कामाचा आढावा बच्चू कडू यांनी घेतला. कोरोना निर्मूलनासाठी अधिकारी, कर्मचारी करत असलेल्या कामाबाबत बच्चू कडू यांना फार आस्था वाटायची. आपण ज्या दर्जाचा मास्क वापरतो तसे मास्क रुग्णाची सेवा करणाऱ्या तरुण डॉक्टरांकडे नाही, याचे कडू यांना दुःख वाटत होते. आशा साऱ्या प्रसंगांचा उल्लेख बच्चू कडू यांनी पत्रात केला आहे. अमरावतीचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निकम यांनी बच्चू कडू यांच्या तपासणीसाठी एका नर्सला पाठवले. तपासणीनंतर डॉ. निकम यांना रिपोर्ट्स थोडे संशयास्पद वाटले. तशी माहिती डॉ. निकम यांना कडू यांच्या पत्नी नयना कडू यांना दिली. त्यानंतर बच्चू कडू यांच्याकरिता घरात वेगळा बेड, वेगळे ताट अशा सगळ्या वस्तुंची वेगळी व्यवस्था करण्यात आली. या परिस्थिती बच्चू कडू पुरते खचले होते.
रिपोर्ट निगेटिव्ह येताच...
कडू यांनी डॉ. प्रफुल आणि डॉ. शिवरत्न शेटे यांच्याशी संपर्क साधला. मित्र असणाऱ्या दोन्ही डॉक्टरांनी बच्चू कडू यांना धीर दिला. पत्नी नयना आणि मुलगा देवा बच्चू कडू त्यांची काळजी घेत होते. यावेळी आपल्यामुळे आपले सारे संकटात सापडणार की काय, या विवंचनेने बच्चू कडू यांना वेदना होत होत्या. हा सर्व दुःखाचा काळ सलग तीन दिवस असताना एका सायंकाळी अनुप खांडे या खासगी सचिवाने बच्चू कडू यांना फोन केला आणि 'तुमचा रिपोर्ट निगेटिव्ह आला' असे सांगितले. हे ऐकताच बच्चू कडू यांनी आनंदाने उंच उडी मारली, पत्नी नयनला मिठी मारली. तीन दिवसांचा हा सारा अनुभव बच्चू कडू यांनी पत्राच्या मार्फत जगजाहीर केला आहे. या पत्राद्वारे नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी. सध्या घराबाहेर पडू नये, असे आवाहन बच्चू कडू यांनी केले आहे.
हेही वाचा- संचारबंदी असतानाही भरवला भाजीबाजार, तहसीलदारांनी बजावली कारणे दाखवा नोटीस