अमरावती - भारतात 130 कोटी लोकसंख्या आहे. इतक्या मोठ्या संख्येत असणाऱ्या लोकांना तपासणे सोपे काम नाही. त्यामुळे नागरिकत्व संशोधन कायद्याची अंमलबजावणी करण्यास आणखी शंभर वर्षे लागतील. आसाममध्ये या कायद्याची चाचणी करणाऱ्या भाजपचा हा कायदा लागू करण्यापेक्षा या कायद्याच्या नावाखाली जातीयवाद वाढविण्याचा डाव असल्याचा आरोप महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज अमरावतीत केला.
नागरिकत्व संशोधन कायद्याच्या विरोधात अमरावतीत 13 जानेवारीपासून 23 जानेवारीपर्यंत इर्विन चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मुस्लिम समाजाच्या वतीने सत्याग्रह आंदोलन छेडण्यात आले आहे. आज महाराष्ट्राचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार अमरावतीत आले असता त्यांनी या आंदोलन स्थळाला भेट दिली. संपूर्ण देशात मुस्लिम समाजाचा विरोध नागरिकत्व संशोधन कायद्याला आहे. त्यामुळे या कायद्याच्या विरोधात आंदोलन करताना इतर कुठलेही वादग्रस्त मुद्दे येऊ नये, याचे भान राखण्याचा सल्ला सत्तार यांनी आंदोलकांना दिला.
हेही वाचा - अमरावतीमध्ये कुऱ्हा महोत्सवाचे थाटात उद्घाटन, दोन दिवस राहणार कार्यक्रमांची रेलचेल
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, संपूर्ण देशात नागरिकत्व संशोधन कायद्याच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. हा कायदा लागू होणे चुकीचे आहे. महाराष्ट्रात आमचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या कायद्यासंदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत चर्चा करून योग्य असा निर्णय घेतील. हा कायदा आपल्यावर अन्याय करणारा असल्याची शंका मुस्लीम समुदायाला आहे. त्यामुळे असा कायदा होऊ नये. आपला देश हा 130 कोटी लोकसंख्या असणारा देश असून अशा महाकाय लोकसंख्या असणाऱ्या देशात असा कायदा यशस्वी होऊ शकणार नाही.
हेही वाचा - ऐन 'रस्ता सुरक्षा सप्ताहात' अमरावतीत वाहतुकीची दाणादाण