अमरावती : औरंगाबाद येथून नागपूर कडे भरधाव जाणाऱ्या एसटी बसचा नांदगाव पेठ येथील उड्डाणपूलावर भीषण अपघात झाला. (ST Bus accident on flyover). बुधवारी सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली आहे. अपघातात बस चालक गंभीर जखमी झाला असून बसमधील प्रवासी मात्र सुखरूप बचावले आहेत. घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी जमली असून नांदगाव पेठ पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. जखमी चालकाला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (ST Bus accident in Amravati).
असा झाला अपघात : नागपूर आगारची औरंगाबाद नागपूर बस क्र एम.एच.४०,वाय,५८२८ ही बस सायंकाळी साडे सहा वाजता अमरावती येथून नागपूर कडे रवाना झाली. सात वाजताच्या दरम्यान नांदगाव पेठ उड्डाणपूलावरून जातांना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस उड्डाणपुलावरील कठड्याला जाऊन भिडली. यामध्ये बस चालक खाली पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली तर बसमध्ये असणारे ३२ प्रवासी सुखरूप असल्याची माहिती आहे.
पोलीसांची अपघातस्थळी धाव : घटना घडताच नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण काळे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण वाहतूक व्यवस्था सुरळीत करून जखमी बस चालकाला रुग्णवाहिकेच्या मदतीने जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. उड्डाणपूलावर अडकलेली बस क्रेनच्या मदतीने बाजूला करण्यात आली. अपघातात बसच्या पुढच्या भागाचे प्रचंड नुकसान झाले आहे. घटनेचा पुढील तपास नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण काळे करीत आहे.