अमरावती - जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरू असून यासाठी अमरावती जिल्ह्यात रात्री 8 वाजल्यापासून 36 तासांचा म्हणजे सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत लॉकडाऊन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जाहीर केला. त्यामुळे रात्रीपासून मेडिकल व हॉस्पिटल वगळता सर्व दुकाने बंद आहेत.
विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर वॉच
विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या लोकांवर वॉच ठेवण्यासाठी पोलिसांचा अमरावती शहरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अमरावतीमधील नेहमी गजबजलेल्या चौकापैकी राजकमल चौक, इर्विन चौक, पंचवटी चौक, जयस्तंभ चौकात आज स्मशान शांतता दिसून आली. याठिकाणी व इतर गल्लीतील नागरिक घराबाहेर आले नव्हते. तर सर्व दुकाने कडकडीत बंद होती. त्यामुळे सकाळी अमरावतीकरांनी या लॉकडाऊनला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आहे. रस्त्यावर फक्त पोलीसच दिसून आले. अमरावतीचे रस्ते आज पुन्हा निर्मनुष्य झाले होते.
प्रतिबंधित क्षेत्रे -
श्रीकृष्ण पेठ, सबनीस प्लॉट, महाजन पुरा, एलआयसी कॉलनी, भाजी बाजार, अनुराधा नगर, सद्गुरुधाम वसाहतजवळ, चंद्रावतीनगर, उषा कॉलनी, भारत नगर, साईनगर, खंडेश्वर कॉलनी हा परिसर प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.