अमरावती - परतीच्या पावसाने सोयाबीन पिकाला जबर फटका बसला. त्यांनतर उरले-सुरले सोयाबीन घरी आणल्यावर सडू लागले. लोकांचे पैसे द्यायचे म्हणून बाजारपेठेत विकायला आणलेले सोयाबीन, पुन्हा पावसाने भिजले. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत हा प्रकार घडला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीन विक्रीसाठी आणले होते. दरम्यान मुसळधार पावसाला सुरूवात झाली. पावसामुळे शेतकऱ्यांनी आणलेले संपूर्ण सोयाबीन भिजले. त्यामुळे शेतकऱ्यांचा माल आता व्यापारी देखील विकत घ्यायला तयार नाही. आधीच अवकाळी पाऊस व विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीन पिकाला फटका बसला. शेतकऱ्यांनी शेतातील सोयाबीन कापणी करून बाजार समितीत विक्रीसाठी आणले असता मोठ्या प्रमाणावर पावसात भिजले. यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले.
कृषी उत्पन्न बाजार समितीला शेड नसल्याने हा प्रकार घडला. सोयाबीन भिजल्यामुळे व्यापारी खरेदी करायला तयार नाही. या सोयाबीनचे काय करायचे हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. बाजार समितीत आणलेल्या मालाची जबाबदारी बाजार समितीकडे असते. त्यामुळे भिजलेल्या सोयाबीनची जबाबदारी समितीने घ्यावी आणि मालाचे पैसे द्यावे, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.