अमरावती - जिल्ह्यातील चांदूर रेल्वेजवळील शेंदूरजना खुर्द येथे वृद्ध आईचा मृत्यू झाल्यानंतर दफनविधीसाठी मुलाने घरातील अंगणातच खड्डा खणल्याचा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला. सदर माहिती, गावातील पोलीस पाटील यांनी तळेगाव दशासर पोलिसांना दिली. मात्र, वृध्द महिलेच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
त्रिवेणीबाई वायलोजी पाटील (वय ७५) असे मृत वृद्धेचे नाव आहे. मानसिकरित्या खचलेल्या गिरीधर पाटील (वय ४५ वर्षे) या तिच्या मुलाने पार्थिवासाठी अंगणात खड्डा खणला. पतीचे निधन व मोठ्या मुलीच्या विवाहानंतर वृद्ध त्रिवेणीबाई आणि मुलगा गिरीधर हे दोघेच घरात राहत होते. गिरीधर यांचा विवाह काही वर्षांपूर्वी झाला. मात्र, त्यांची पत्नी त्यांना सोडून गेली आहे.
शुक्रवारी नजीकच्या धनोडी गावाहून गिरीधर घरी परतला. शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास तो शेजाऱ्यांना अंगणात खड्डा खणताना दिसला. मात्र, दररोज काम करणाऱ्या वृद्ध त्रिवेणीबाई दिसल्या नाहीत. ही बाब शेजाऱ्यांनी पोलीस पाटील यांना कळवली. त्यानंतर पोलीस पाटील यांनी तळेगाव दशासर पोलिसांना माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक सावंत यांनी घटनास्थळी धाव घेतली असता, गिरीधरची आई त्रिवेणीबाई यांचा मृतदेह घरात चटईवर आढळून आला. तर अंगणात २ बाय ३ फुटाचा खड्डा खणल्याचे दिसले.
शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर त्रिवेणीबाईंचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे स्पष्ट होणार असल्याचे तळेगाव दशासर पोलिसांनी सांगितले. चांदूर रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात त्रिवेणीबाई यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्रिवेणीबाई यांचा मृत्यू उपासमारीने झाल्याचा प्राथमिक अंदाज तळेगाव दशासर पोलिसांनी वर्तवला आहे. मुलगा गिरीधर हा गतिमंद असल्याचे समजते.