अमरावती - शासनाव्दारे सोफिया औष्णिक वीज प्रकल्पाला अप्पर वर्धा धरणातून मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आगामी काळात गंभीर होऊ शकतो. त्यामुळे या धरणातून सोफियाला विद्युत प्रकल्पाचा पाणी पुरवठा तात्काळ बंद करण्यात यावा, अशी मागणी मोर्शी व वरुड तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.
मोर्शी व वरुड तालुका आधीच ड्रायझोनमध्ये असून, मागील दोन वर्षांपासून दुष्काळाने येथील शेतकऱ्यांची लाखो संत्राची झाडे पाण्याअभावी वाळलेली आहे. यावर्षी पावसाने दगा दिल्यामुळे अप्पर वर्धा धरणामध्ये फक्त 11 टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे सोफियाला दिले जाणारे २४ हजार हेक्टर सिंचन क्षमतेचे पाणी बंद करावे. विदर्भासह संपूर्ण राज्यात पाणी टंचाईची भीषणता लक्षात घेता, मोर्शी व वरुड तालुक्यासह अमरावती शहर आणि बडनेरावासियांमध्ये सोफियाविरुद्ध असंतोष खदखदत आहे. त्यामुळे सोफिया औष्णिक विद्युत प्रकल्पाला देण्यात येणारे पाणी ७ दिवसात बंद करावे. अन्यथा ७ दिवसानंतर पाणी प्रश्न समितीद्वारे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा तहसीलदार यांना निवेदन देऊन देण्यात आला. यावेळी शेकडो शेतकरी उपस्थित होते.