अमरावती - सध्या सर्वत्र कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. या संकटाच्या काळात प्रशासन मोठ्या हिंमतीने काम करत आहे. तसेच काही सामाजिक संघटना, संस्था, राजकीय नेते आपापल्या परीने मदत करत आहेत. तसेच काहीजण सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रबोधन करत आहेत. आज (रविवार) अक्षय्य तृतीयानिमित्त सोशल मीडियावर एक संदेश व्हायरल होत आहे. 'मास्क' हाच सर्वोत्तम दागिना असल्याचा हा संदेश आहे.
वेगवेगळ्या कल्पनेमधून वेगवेगळे सामाजिक संदेश सोशल मीडियावर प्रसिद्ध होत असतात. भन्नाट अशा कल्पनेचा वापर सोशल मीडियाच्या माध्यमातून होत असतो. अक्षय्य तृतीयेला सोन्याची खरेदी केली जात असते. परंतू, संचारबंदीच्या काळामध्ये सर्वच दुकाने बंद असून सर्वत्र शुकशुकाट आहे. नाहीतर अक्षय तृतीयेच्या दिवशी सराफा बाजारात सोने विकत घेण्याकरता बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. परंतू, या अक्षय्य तृतीयेला लॉकडाऊनमुळे ब्रेक लागला आहे. अशा स्थितीमध्ये सोन्याच्या रूपात अक्षय्य जीवनासाठी सर्वोत्तम दागिना 'मास्क' असा सामाजिक संदेश सोशल मीडियामधून दिला जात आहे.