बदनापूर - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. शुक्रवारी बदनापूर येथे भरणाऱ्या आठवडी बाजारातही नगर पंचयतने सोशल डिस्टन्सिंग ठेवत दुपारी दोनपर्यंत गर्दी न होऊ देता नियोजन करून विक्रीची दुकाने लावली.
बदनापूर येथे शुक्रवारी आठवडी बाजार असतो. तालुक्यातील सर्वात मोठा बाजार येथे भरतो. विक्रेते व ग्राहकांची मोठी गर्दी येथे असते. या वेळी मात्र नगर पंचायतचे मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे, अभियंता गणेश ठुबे यांनी नियोजन करून सर्व विक्रेत्यांना जागा निश्चित करून दिली सकाळी 7 ते 2 या वेळेतच परवानगी देण्यात आली. तसेच नगर पंचायतचे कर्मचारी या दरम्यान येथे तळ ठोकून बसलेले होते.
विनामास्क व गर्दी करणाऱ्यांना ते सूचना देत होते. त्याचप्रमाणे बाजारच्या कालावधीत स्पीकरवर कोरोनाबाबत व सोशल डिस्टनसिंग पाळणे बाबत सूचना देण्यात येत होत्या. त्याचा सकारात्मक परिणाम होऊन नागरिकांनी शिस्तीत खरेदी केली.