अमरावती : सध्या सगळीकडे ई-कॉमर्स कंपन्यांवरुन वस्तु खरेदी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. ई कॉमर्स कंपन्यांकडून खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. विविध प्रकारच्या ऑफर्स या कंपन्यांकडून दिल्या जातात. कंपन्यांच्या पोर्टलवर आणि ॲपमध्ये दिसणारी तीच वस्तू आपण ऑर्डर केल्यानंतर मिळेल की नाही याची मात्र काही शाश्वती नसते. एका ग्राहकाने आघाडीच्या ई-कॉमर्स कंपनीकडून मोबाईल ऑर्डर केला आणि प्रत्यक्षात मात्र त्याला लक्स आणि लाईफ बॉय साबण आला आणि डमी मोबाईल आला. त्यामुळे ऑनलाइन शॉपिंग नको रे बाबा. असे म्हणण्याची वेळ या ग्राहकावर आली आहे.
ओरीजनल वन प्लस ऐवजी रेडमी : अमरावती जिल्ह्यातील चांदूररेल्वे शहरातील निलेश चंदाराणा यांनी कुटूंबातील एका सदस्याकरिता वन प्लस कंपनीचा २८ हजार ९९९ रूपये किंमतीचा २ टी ५ जी मोबाईल एका नामांकित ऑनलाईन शॉपींगव्दारे १७ जानेवारीला बूक केला होता. सदर मोबाईलचे पार्सल मिळाल्यानंतर त्यांनी २४ जानेवारीला डिलिव्हरी बॉय समक्ष पॅकींग उघडली. तेव्हा त्यामध्ये ओरीजनल वन प्लस कंपनीच्या मोबाईल ऐवजी रेडमी ९ हा डमी फोन आला. सोबत त्यात लक्स, लाईफबॉयचे साबन होते. हा प्रकार बघून निलेश चंदाराना हे अचंबित झाले. यानंतर त्यांनी डिलिव्हरी बॉयच्या माध्यमातून संबंधित कंपनीकडे तक्रार केली आहे. याप्रकरणाची चौकशी करून कंपनीने दोषींवर कारवाई करावी. तसेच नवीन मोबाईल देण्यात यावा अशी मागणी त्यांनी कंपनीकडे केली आहे.
दुकानातून खरेदी करावी : ऑर्डर केलेली वस्तू त्यामध्ये विविध प्रकारचे सूट दिले जाते. ऑनलाईनऐवजी प्रत्यक्ष दुकानातून खरेदी करा. ऑनलाईन मोबाईल ऑर्डर केल असता त्यात डमी मोबाईल व साबन आले. त्यामुळे ऑनलाईन शॉपींगमध्ये असलेली फसवणुक पाहता ग्राहकांनी ऑनलाईन ऐवजी दुकानातून वस्तूंची खरेदी करावी असे आवाहन निलेश चंदाराणा यांनी केले आहे. त्यामुळे ऑनलाइन शॉपिंग नको रे बाबा असे म्हणत ग्राहकांमध्ये चर्चेचा एकच विषय बनलेला आहे.
ऑनलाईन खरेदीत घ्या काळजी : ज्या वेबसाइटवरून आपण आवडती वस्तू खरेदी करणार आहात, त्या वेबसाइटच्या सर्वांत खालच्या ठिकाणी 'वेरी साइन ट्रस्डेट' अशा पद्धतीचं सर्टीफिकेट त्या वेबसाइटवर दिलेले आहे किंवा नाही हे आधी तपासून पहा. सध्या विविध वेबसाइट ऑनलाइन विक्रीच्या क्षेत्रात उतरल्या आहेत. मात्र, या वेबसाइट ई-कॉमर्सच्या नियमानुसार सुरू करण्यात आलेल्या आहेत किंवा नाहीत, हे आधी तपासून पाहणे आवश्यक आहे. अनेक नामवंत कंपन्यांच्या स्वत:च्या ऑनलाइन विक्रीसाठी वेबसाइट आहेत, त्या अधिकृत आहेत किंवा नाहीत याची खात्री करून घ्यावी. त्यासाठी संबंधित कंपनीच्या कॉलसेंटरवर फोन करून माहिती घेता येऊ शकते.
माहिती तपासून घ्यावी : खरेदीपूर्वी सुरक्षित खरेदी कशी करावी याची माहिती देणाऱ्या वेबसाइट, यू-ट्यूब व्हिडिओ पाहून घ्यावेत. संबंधित वेबसाइटवरून खरेदी केलेल्या इतर ग्राहकांनी त्यांना आलेले अनुभव जे काही चांगले किंवा वाईट आहेत, त्याची माहिती दिलेली असते. ग्राहकांनी दिलेले 'रिमार्क' वाचून आपण खरेदी करण्यापूर्वी योग्य निर्णय घेऊ शकतो. ज्या कंपनीची वस्तू आपण खरेदी करणार आहात, त्या कंपनीची ऑनलाइन खरेदी संदर्भात माहिती तपासून घ्यावी, त्यामुळे होणारी संभाव्य फसवणूक टाळली जाऊ शकते.