अमरावती - जिल्ह्यातील बडनेरा शहरातील नवी वस्ती भागातील नागरी वस्तीमध्ये पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ बनसोड यांनी आंदोलन केले. बनसोड यांनी पाण्याच्या टाकीवर चढून घोषणाबाजी करत आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा - डिझेल दरवाढीचा शेतकऱ्यांना फटका; मशागतीसाठी लागणाऱ्या ट्रॅक्टरची भाडेवाढ
बडनेरा शहरात ज्या भागात पाणीपुरवठा करण्यात येतो त्यातसुद्धा प्राधिकरणात नियमितता दिसून येत नाही. नागरी वस्तीला पाणी सोडण्याचा एक निर्धारीत वेळ नसल्याने नागरिकांना विशेषत: महिलांना याचा त्रास सहन करावे लागतो. याबाबात सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ बनसोड यांनी वारंवार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग क्रं. ३ बडनेरा येथील अभियंताना कळविले. निवेदने देखील दिली. तरीसुद्धा बडनेरा शहरातील पाण्याचा प्रश्न मिटत नसल्यामुळे अखेर सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ बनसोड यांनी पाण्याच्या टाकीवर चढून घोषणाबाजी करत आंदोलन केले.
सुरळीत पाणी पुरवठा नसल्याच्या तक्रारी
बडनेरा येथे सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याच्या महिलांच्या तक्रारी आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याने महिलांना त्रास सहन करावा लागतो. पाणी पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी यापूर्वीही निवेदने देण्यात आली होती, परंतु प्रशासनाच्या वतीने कुठलीही दखल घेतली नसल्याने आज शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे प्रशासनाची काही वेळ चांगलीच दमछाक झाली. प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
हेही वाचा - अमरावती जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, हवामान विभागाचा अंदाज ठरला खरा