अमरावती - गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेली कोरोना लस ही मागील महिन्यात आल्यानंतर प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात झाली. कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात केवळ डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविकांना प्राधान्याने मोफत लस देण्याचे निर्देश असताना, अमरावतीच्या अचलपूर येथील डॉक्टरांनी त्यांच्या कुटुंबाला आणि मित्रांना सुद्धा या लसीकरणाचा लाभ मिळवून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात आता जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान या प्रकाराने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील भंसाली सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर भंसाली यांनी त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती आणि मित्र अशा एकूण 19 जणांची यादी लसीकरणासाठी अचलपूर उपजिल्हा रुग्णालयाकडे पाठवली, व त्यानुसार त्या 19 जणांना कोरोना लस देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने देखील यादीमध्ये कोणत्या व्यक्तींचा समावेश आहे, याची पडताळणी केली नाही. दरम्यान हे प्रकरण समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सकांकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
अनेक ठिकाणी सुरू आहे प्रकार
कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात केवळ सरकारी आणि खासगी क्षेत्रातील आरोग्य सेवकांना ही लस देण्याचे सरकारचे आदेश आहेत. मात्र असे असतानाही अनेक ठिकाणी डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी आपल्या कुटुंबातील लोकांना या लसीचा लाभ मिळून देत असल्याचे समोर येत आहे. अचलपूरमध्ये देखील असाच प्रकार समोर आला आहे.